सेकंड हँड कार खरेदी करताय? आधी हे वाचा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक व्यक्तीला नवीन कार खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र आर्थिक किंवा इतर कारणांमुळे अनेकांना नवीन कार खरेदी करणे शक्य होत नाही. अशा वेळी सोयीचा पर्याय म्हणून अनेक जण ‘सेकंड हॅंड’ कार खरेदी करतात. हिंदुस्थानात सेकंड हॅंड कारचे मार्केट वाढत चालले आहे. अशातच जर तुम्ही सेकंड हॅंड कार खरेदी करण्याचा विचार करत असला, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जुन्या कारच्या तुलनेत नवीन कार घेताना फार गोष्टींचा विचार करावा लागत नाही. मात्र जुनी कार घेताना तुम्हाला त्या कारचे फीचर्स, कारची बॉडी आणि इंजिन तपासून घ्यावे लागते. आज आम्ही तुम्हाला सेकंड हॅंड कार खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊन कोणत्या आहेत त्या गोष्टी…

कारची बॉडी नीट तपासून घ्या  

बर्‍याच वेळा डीलर्स जुनी खराब कार व्यवस्थित स्वच्छ करून ग्राहकांना विकतात. यामुळे सेकंड हॅंड कार खरेदी करताना कारची बॉडी नीट तपासून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही कारची योग्य किंमत ठरू शकाल.

अ‍ॅक्सिडेंटल कार आहे की नाही

आपण खरेदी करत असलेल्या कारचा कधीही अपघात झालेला आहे की नाही? याची माहिती करून घ्या. जेणेकरून आपण त्या कारची योग्य किंमत निश्चित करू शकाल. अनेक वेळा कार डीलर्स अपघात झालेल्या कारचे डेन्ट-पेंट करता. यामुळे कार बद्दल योग्य माहिती मिळणे अवघड होते.

इंटिरियल 

बाहेरून कारची बॉडी पाहण्यासोबतच कार आतूनही व्यवस्थित आहे की नाही हे नीट तपासून घ्या. कारच्या आतील इंटिरियल व्यवस्थित आहे की नाही? म्युझिक सिस्टम, लाईट्स, एसी, हॉर्न आणि पॉवर स्टीयरिंग इत्यादी गोष्टींसह इतर फीचर्स ही नीट तपासून घ्या.

इंजिन 

आपण कारची इतर सर्व फीचर्स स्वत: तपासू शकता, परंतु कारचे इंजिन तपासणे सामान्य माणसासाठी अवघड आहे. सेकंड हँड कार खरेदी करताना आपण आपल्यासोबत आपल्या ओळखीचा एखादा मेकॅनिक घेऊ जाऊ शकता. या व्यतिरिक्त आपण स्वतः वाहन चालून किंवा मेकॅनिककडून वाहन चालवून इंजिनची तपासणी करू शकता.

कार पेपर 

कार खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी करा. जसे की आरसी, इन्शुरन्स, पीयूसी आणि आवश्यक कागदपत्रांसह इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करूनच कार खरेदी करा.