
वाहन चालक परवान्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. आपण गाडी चालवत असाल आणि तुमच्या चालक परवान्याची वैधता लवकरच संपणार असले, तर आज आम्ही तुम्हाला याच्याशी संबंधित एक महत्वाची माहिती सांगणार आहोत. जर तुम्ही वाहन चालक परवाना रद्द होण्याच्या एक वर्षाच्या आत परवान्यांचे नूतनीकरण केले नाही, तर तुम्हाला पुन्हा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून परवाना काढावा लागेल. वाहन चालक परवाना काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा लर्निंगच्या प्रक्रियेतून जावं लागेल. त्यात तुम्हाला 20 अंकाची संगणक परीक्षा देऊन तात्पुरती शिकावू परवाना घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा कायमस्वरूपी परवान्यासाठी 30 दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.
आता कालबाह्य झालेला चालक परवाना घेऊन वाहन चालविताना पकडले गेल्यास 500 रुपये दंड भरावा लागतो. चालक परवान्याची मुदत संपल्यानंतर सामान्य अर्ज करून परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागेल. त्यासाठी चालकाला 30 दिवस प्रतीक्षाही करावी लागणार आहे, ज्यात कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. आरटीओमध्ये अर्जदारास ओळख आणि राहण्याचा पुरावा अशी कागदपत्रे पुन्हा द्यावी लागणार आहे, तसेच बायोमेट्रिकही घेतले जाणार आहे.
देशातील प्रत्येक राज्यात वाहन चालक परवाने वेगवेगळे बनवले जातात, जे रंग आणि आकारात भिन्न असू शकतात. मात्र केंद्र सरकारने देशात 1 ऑक्टोबर 2019 पासून वाहन चालविण्यास परवान्याशी संबंधित नियम बदलले आहेत. या नियमानंतर, सर्व लोकांना आपला वाहन चालविण्याचा परवाना बदलून घ्यावा लागणार आहे. सध्या हिंदुस्थानात सर्व राज्यांमध्ये वाहन चालविण्याचे परवाने वेगळे आहेत. मात्र या नियमानंतर देशात सर्व वाहन चालक परवाने एकसारखे असणार आहेत.




























































