
ऑक्सिओम मिशन-4 उद्या मंगळवारी अंतराळात झेप घेणार आहे. 10 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी या मिशनसाठी उड्डाण होईल. या मिशनमध्ये चार देशांतील चार अंतराळवीर असणार आहेत. स्पेसएक्सच्या ड्रगन कॅप्सूलमधून शुभांशू शुक्ला (भारत), पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोस उज्नांस्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) हे चौघे जण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत. यात शुभांशू शुक्ला हे पायलट असणार आहेत. हे सर्व जण 14 दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकणार आहेत. यात शुभांशू शुक्ला हे 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत.
या मिशनसाठी शुभांशू शुक्ला यांनी रविवारी स्पेसएक्सचा फ्लाइट सूट घालून फुल ड्रेसमध्ये अंतराळ स्थानकात जाण्याआधी अखेरचा सराव केला. यामध्ये त्यांनी असेंब्ली बिल्डिंगपासून रॉकेटपर्यंत प्रवास करण्याची आणि त्यात बसण्याची प्रक्रिया फॉलो केली. हे चारही अंतराळवीर एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रगन कॅप्सूलमधून उड्डाण करतील. ही मोहीम अमेरिकेची खासगी अंतराळ कंपनी ऑक्सिओम स्पेस आणि नासा यांच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे. या मोहिमेद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध प्रयोग करणे, अंतराळात नवीन तंत्रज्ञानाची चाचणी आणि विकास करणे, विविध देशांतील अंतराळवीरांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
ऑक्सिओमचे चौथे मिशन
ही मोहीम फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन-9 रॉकेटने प्रक्षेपित केले जाईल. ऑक्सिओम स्पेसचे हे चौथे मिशन आहे. 17 दिवसांचे ऑक्सिओम 1 हे मिशन एप्रिल 2022 मध्ये लाँच करण्यात आले होते. ऑक्सिओम 2 चे दुसरे मिशन मे 2023 मध्ये लाँच करण्यात आले होते. तिसरे अभियान 3 जानेवारी 2024 रोजी सुरू करण्यात आले, ज्यामध्ये क्रूने 18 दिवस अंतराळ स्थानकावर घालवले. चौथ्या मिशनमध्ये अनेक प्रयोग केले जाणार असून यात सुपरफूड्सवर शोध, टार्डिग्रेड्सच्या अंतराळात जीवित राहण्याची क्षमता आदीवर प्रयोग केले जाणार आहेत.
कोण आहेत शुभांशू शुक्ला
शुभांशू शुक्ला हे मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहेत. शुभांशू यांना 17 जून 2006 रोजी हवाई दलाच्या लढाऊ शाखेत सामील करण्यात आले. त्यांना 2000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-32 सारखी लढाऊ विमाने उडवली आहेत. शुभांशू यांची 2027 मधील गगनयान मिशनसाठी निवड झालेली आहे.