अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी बुधवारी पूर्ण होण्याची शक्यता

578
supreme-court

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी बुधवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक पक्षकारांसाठी वेळ निश्चित केली आहे. मुस्लीम पक्षकारांना एका तासाचा वेळ देण्यात आला असून चारही हिंदू पक्षकारांना 45 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. मंगळवारी सुनावणीचा 39 वा दिवस होता. ही सुनावणी 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत ठरवण्यात आली होती. मात्र, सुनावणी एक दिवस आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी बुधवारी पूर्ण होण्याचे संकेत सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी दिले आहेत. बुधवारी दुपारी जेवणाच्या सुटीनंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा होणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षकार राजीव धवन यांनी न्यायालयात सांगितले की, सुनावणीदरम्यान फक्त मुस्लीम पक्षकारांना म्हणजेच आपल्याला अनेक पश्न विचारण्यात येत आहेत. त्यावर न्यायालयाने कोणतेही भाष्य केले नव्हते. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हिंदू पक्षकारांचे वकील के. परासरण यांना न्यायालयाने अनेक प्रश्न विचारले. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राजीव धवन यांना विचारले, न्यायालय हिंदू पक्षकारांना योग्य प्रश्न विचारत आहे ना, या प्रश्नांबाबत तुम्ही समाधानी आहात का. या वक्तव्याने न्यायालयात हंशा पिकला. त्यानंतर परासरण म्हणाले, न्यायालयांच्या प्रश्नांबाबत आपल्याला कोणताही आक्षेप नाही. आपलयाकडे या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. ती आपण देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, न्यायालयाने सुन्नी वफ्फ बोर्डाचे चेअरमन जफर फारुखी यांनी पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. ही सुनावणी अंतिम टप्प्यात असून अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या