कायदा बनवा, राममंदिर बांधा!-उद्धव ठाकरे

सामना प्रतिनिधी। अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पुन्हा एकदा अयोध्येत येऊन रामलल्लांचे दर्शन घेतले. शिवसेनेच्या 18 विजयी खासदारांसह उद्धव ठाकरे हे रामजन्मभूमीवर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी अवघी अयोध्या नगरी भगवी झाली होती. त्यांचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत झाले. उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच रामजन्मभूमीचा परिसर ‘जय श्रीराम…’च्या जयघोषाने दुमदुमला. ‘मी पुन्हा-पुन्हा अयोध्येला येईन’ असे अभिवचन अयोध्यावासीयांना देतानाच अयोध्येत राममंदिर होणारच, असा ठाम आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे रविवारी सकाळी विशेष विमानाने फैजाबाद विमानतळावर उतरले. तिथे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते. विमानतळावर उतरताच उद्धव ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तिथून कडक बंदोबस्तात त्यांचा ताफा रामजन्मभूमीकडे निघाला. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शिवसैनिक आणि अयोध्यावासीयांनी गर्दी केली होती.
रामललांचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अयोध्येला पुन्हा येईन, असे अयोध्यावासीयांना गेल्या नोव्हेंबरमध्ये दिलेले वचन मी आज पूर्ण केले, असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्या ही अशी जागा आहे जिथे पुन्हा-पुन्हा यावेसे वाटते. नव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे याचा उल्लेख पत्रकारांनी केला असता सभागृहात जाण्यापूर्वी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी रामललांचे दर्शन घेतले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ‘‘राम मंदिर हा शिवसेनेसाठी निवडणुकीचा मुद्दा असल्याचे काही जण म्हणत होते. पण गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये रामजन्मभूमीवरील रामललांचे दर्शन घेतल्यानंतरच आम्ही ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा दिली होती. त्या वेळी अनेकांना वाटत होते की, आम्ही पुन्हा अयोध्येत येणार नाही. पण अयोध्येत आल्यानंतर हा मुद्दा पुन्हा तापला आणि त्याला गती मिळाली,’’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मंदिरासाठी जगभरातील हिंदू सरकारसोबत
राम मंदिर निर्मितीबद्दलच्या एका प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘‘अयोध्या प्रकरण सध्या न्यायालयात आहे. पण आता मंदिर निर्मितीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आता केंद्रातही पहिल्यापेक्षा जास्त मजबूत सरकार आले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिंमतही आहे. सरकारने मंदिर निर्मितीचा निर्णय घेतला तर जगभरातील हिंदू त्यांच्या सोबत असतील!’’

हिंदू एक व्हावेत ही शिवसेनाप्रमुखांची इच्छा
या देशातील सर्व हिंदू एक व्हावेत आणि त्यांची ही एकजूट, ही ताकद कायम राहावी असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगायचे. देशातील हिंदूंची एकजूट ही बाळासाहेबांची इच्छाच होती. म्हणूनच आम्ही महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवल्या नाहीत असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आता उशीर नको, अध्यादेश आणा, कायदा करा!
अयोध्येत राममंदिर व्हावे हा केवळ शिवसेनेच्याच नव्हे तर देशातील हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. राममंदिर व्हावे ही हिंदुस्थानच्या तमाम जनतेची इच्छा आहे, असे सांगतानाच आता उशीर करू नका, अध्यादेश आणा, कायदा करा आणि अयोध्येत राममंदिर बांधा, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता राममंदिर बांधण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने जनतेच्या भावनांचा आदर करायलाच हवा, असे ते म्हणाले.