अयोध्येचे निकालपत्र नेमके लिहिले कोणी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court-of-india

हिंदू-मुस्लिमांच्या भावनांचा आदर करीत अयोध्या खटल्याचा ऐतिहासिक निकाल देणाऱया सर्वोच्च न्यायालयाने 70 वर्षे जुन्या परंपरेबाहेरील काही गोष्टी केल्या. 1024 पानी निकालपत्रात पहिल्यांदाच निकाल लिहिणाऱया न्यायमूर्तींचे नाव व सहीचा उल्लेख टाळला आहे. त्यामुळे पाच न्यायमूर्तींपैकी नेमका कोणी निकाल लिहिला, याचे रहस्य कायम आहे. जाणकारांच्या मते, निकाल लिहिण्याच्या शैलीवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांची छाप आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने शनिवारी अयोध्येचा ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाच्या परंपरेनुसार निकालपत्राच्या शेवटी घटनापीठाच्या वतीने निकाल लिहिणाऱया न्यायमूर्तींचे नाव व सही असते आणि तेच न्यायमूर्ती कोर्टरुममध्ये निकालपत्र वाचतात. अयोध्येचा निकाल देताना मात्र घटनापीठाने निकालपत्र लिहिणाऱया न्यायमूर्तींची ओळख गोपनीय ठेवली आहे. सरन्यायाधीश गोगोई यांनी या खटल्याच्या निकालपत्राचे वाचन केले. हा निकाल देताना पहिल्यांदाच 116 पानी परिशिष्ट जोडण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची निकाल लिहिण्याची खास शैली असते. तसेच ते विशेष प्रकारचा फॉन्ट वापरतात. जाणकारांच्या मते, विशिष्ट शैली व फॉन्टचा वापर पाहिल्यास या निकालपत्रावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांची छाप दिसून येते.

परिशिष्टमध्ये काय आहे ?

पाचसदस्यीय घटनापीठाने एकमताने निकाल दिला असला तरी एका न्यायमूर्तींनी परिशिष्टमध्ये स्वतंत्र मते नोंदवली आहेत. श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंनी नेहमीच पूजा केली असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्राचीन हिंदू शास्त्र्ावचनांचा संदर्भ देण्यात आला. बाबरी मशिद उभारली गेली, ती प्रभू श्रीरामाच्या जन्माची जागा असल्याचे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांनी बृहद-धर्मोत्तरा पुराण आणि स्कंद पुराण यांचे दाखले दिले. गुरुनानक देव यांनी 1510-11 च्या सुमारास श्रीरामजन्मभूमीला भेट दिल्याचा पुरावा शीख शास्त्र्ावचनात असल्याचे साक्षीदाराच्या जबानीत म्हटले आहे.

विशेष परिशिष्टाचे लेखक न्यायमूर्ती अशोक भूषण

निकाल लिहिण्यासाठी वापरलेला फॉन्ट विचारात घेत विशेष परिशिष्ट न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी लिहिल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासोबत परिशिष्ट जोडण्याची नवीन परंपराही अयोध्या निकालाच्या निमित्ताने सुरू झाली आहे.

निकालपत्रात 17 चॅप्टर व श्रेणीनिहाय विभागणी

अयोध्येच्या निकालपत्रात एकूण 17 चॅप्टर असून ए ते क्यूपर्यंतच्या श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड वगळता सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींपैकी कोणीही निकालपत्र वेगवेगळ्या चॅप्टर वा खंडांमध्ये विभागणी करीत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आधार, शबरीमाला, राईट टू प्रायव्हसी यांसारख्या खटल्यांच्या निकालासाठी काही चॅप्टरचा प्रयोग केला होता.