बाळ बोठेच्या पोलीस कोठडीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोऱहाडे यांनी मंगळवारी दिले. दरम्यान, बोठे हा 3 डिसेंबरपासून फरार झाला होता. तो 3 ते 10 डिसेंबरपर्यंत नगरच्या रेल्वेस्थानकावर होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांना रेल्वेस्थानकाच्या संदर्भातला तपास करावा लागणार आहे.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बोठे यास न्यायालयापुढे उभे करण्यात आले. रेखा जरे हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी करताना तपासी अधिकारी अजित पाटील यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. घटनेनंतर हैदराबादला फरार होण्यापूर्वी बोठे नगरमध्ये कोठे रहात होता? या काळात त्याला कोणी आर्थिक मदत केली? कोणी आश्रय दिला? नगरमध्ये असताना बोठे कोणाच्या संपर्कात होता? या बाबींचा तपास करणे बाकी आहे.

रेखा जरे यांच्या हत्येसाठी 12 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असले, तरी पैश्यांव्यतिरिक्त आणखी काही आमिष बोठेने इतर आरोपींना दाखवले होते का, याची चौकशी आरोपी बोठेकडे करणे बाकी आहे. बोठे हैदराबादला कसा व कोणत्या मार्गाने गेला? याची माहिती अद्यापि बोठेने दिलेली नाही.