करमणुकीने बजबजलेला ‘बाजार’

baazaar

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

प्रत्यक्ष आयुष्यात काही गोष्टी घडत असतात. प्रत्येक व्यवसायात काही खाचाखोचा या असतातच, पण जेव्हा त्या घडणाऱया गोष्टींना प्रचंड फुगवलं जातं, रंगवलं जातं. महानाटय़मयरीत्या रंगवलं जातं तेव्हा त्याचा बॉलीवूड मसाला मिक्स सिनेमा बनतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाजार’सारखा. या सिनेमाला वास्तववादीपणाचा गंध आहे खरा, पण त्यात प्रेक्षकाला आवडेल अशी मसालेदार कल्पनारम्यताच जास्त आहे. रंगीबेरंगी सजलेल्या एखाद्या महागडय़ा बाजारपेठेप्रमाणेच अडीच तासांच्या कालावधीत या सिनेमाची करमणूक दिपवते नक्कीच.

खरं म्हणजे ‘बाजार’ हा सिनेमा म्हणजे थरारपटच आहे. फक्त यात नेहमीप्रमाणे मर्डर मिस्ट्री किंवा तत्सम प्रकार नाही. त्यामुळे हा वेगळा ठरतो. शेअर बाजार आणि त्याभोवती सुरू असलेलं राजकारण हा या सिनेमाचा विषय आहे. शेअर बाजाराचं काम कसं चालतं, लोकांच्या खेळी कशा खेळल्या जातात, कोणाची कधी हार, कधी कोण टॉपला जातं, कधी कोण रसातळाला जातं याचा परामर्ष या सिनेमात घेतलाय. यातल्या काही गोष्टी नक्कीच क्लिष्ट वाटू शकतात, पण सिनेमात इतरही मसाला भरपूर असल्याने त्या क्लिष्टतेकडे सहज कानाडोळा करता येतो.

ही गोष्ट आहे एका छोटय़ा शहरातल्या, पण मोठी स्वप्नं पहाणाऱया तरुणाची. शेअर बाजारात काहीतरी करून दाखवण्यासाठी तो मुंबईत येतो. त्याची स्वप्नं प्रचंड असतात. अशावेळी या जगात त्याला एक गॉडफादर भेटतो. स्वप्नांच्या जवळ जायला त्याला मार्ग मोकळा मिळतो आणि तो त्या मार्गावरून चालू लागतोदेखील पण अचानक कळतं की, या मार्गात किती काटे आहेत आणि नुसते काटे नाहीत, तर जहाल विषारी काटे आहेत. त्याला ते काटे टोचतात आणि तो नैराश्याने घेरला जातो. मग काय होतं, त्याची स्वप्नं मोडतात का, त्याच्या गॉडफादरचं काय होतं या सगळय़ाचा रसभरीत ऊहापोह म्हणजे हा सिनेमा.

या सिनेमाची कथा खूपच साधी सरळ आहे. म्हणजे नाटय़ प्रचंड आहे, पण तरीही यापुढे काय होणार हे अंदाज अगदी पहिल्या दृष्यापासूनच लावता येतात. त्यामुळे त्यात करमणूक असली तरी श्वास रोखून धरण्याइतकी वेळ येत नाही, पण या सगळय़ा सिनेमाची उजवी आणि भक्कम बाजू म्हणजे त्यातला अभिनय. सैफअली खानने जबरदस्त काम केलंय. त्याच्या सहजतेला तोडच नाही. वयासोबत एखादा अभिनेता परिपक्व कसा होत जातो आणि पेक्षकांना सरप्राईज देऊ शकतो ते सैफकडे बघून जाणवतं आणि पुन्हा एकदा राधिका आपटे. तिच्या नेहमीच्याच फॉर्ममध्ये ती या सिनेमातही वावरलीय. अभिनयातील सहजता आणि ग्लॅमरस असूनही नुसती ग्लॅमडॉल न राहता स्वतŠचा छाप उमटवायची क्षमता यामुळे ती आवडून जाते. रोहन मेहरादेखील छान आहे. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्त्व छान आहेच, पण त्याने राधिका आपटे, सैफ इत्यादींसमोर स्वतŠचं वेगळेपण छान उभं केलंय. चित्रांगदाला फारसा वाव नाही, पण तिचा वावर मात्र आल्हाददायक आहे. पडद्यावर तिला पाहणं प्रेक्षकाला नक्कीच सुखावह वाटेल. एकूणच सिनेमाची अभिनय फळी भक्कम आहे आणि ती त्याची एक मोठी बाजू म्हणावी लागेल.

पटकथा बरी आहे. ती आणखी रंगवता आली असती. त्यात वेगळेपणा आणता आला असता, पण ते झालं नाही. संवादही बरे आहेत, पण खास लक्षात राहतील असं त्यात काही नाही. या सिनेमाची मांडणी दिग्दर्शकाने थरारपटाला साजेशीच केली आहे, पण त्यात नावीन्य नाही. म्हणजे सुज्ञ प्रेक्षक चटकन सांगू शकेल की, अशी मांडणी केलीय म्हणजे काय घडणार? तरीही मध्ये मध्ये मध्यवर्ती पात्राने प्रेक्षकांशी बोलायचा फॉर्म आहे. तो मात्र चांगला आहे. त्यामुळे दृष्यांमधली पाल्हाळं वगळून पुढे जाणं सोपं होतं. या सिनेमात स्टॉक मार्केट आणि त्याच्या आतल्या गोष्टी बऱयापैकी दाखवल्या आहेत, पण सगळं काही सोपं करून दाखवलंय. त्यामुळे या सिनेमाची वर्णी फक्त मसालापटातच लागू शकते. त्यापुढे नाही.

बाकी छायांकन चकाचक. गाणी बरी. विशेष वेगळी नाहीत किंवा लक्षातही राहत नाहीत, पण त्यातल्या त्यात बरी आहेत. शेवट अधिक बरा करता आला असता. एकूणच हा सिनेमा दोन घडी करमणूक नक्की करतो. स्टॉक बाजारातल्या खूप काही आतल्या खऱया गोष्टी जाणून घ्यायची अवाच्या सवा अपेक्षा न बाळगता थोडा टाइमपास म्हणून हा सिनेमा नक्कीच पर्याय ठरू शकेल.

दर्जा: ***
सिनेमा: बाजार
निर्माता: निखिल अडवाणी, अजय कपूर, मोनिषा अडवाणी, मधू भोजवानी, इशान सक्सेना, धीरज वाधवान, सुनील शाह
दिग्दर्शक: गौरव चावला
लेखक: निखिल अडवाणी, परवेझ शेख, असीम अरोरा
छायांकन: स्वप्नील सोनावणे
संगीत: तनिष्क बागची, यो यो हनी सिंग, कनिका कपूर, सोहेल शेख, बिलाल सईद
कलाकार: सैफअली खान, राधिका आपटे, चित्रांगदा सेन, रोहन मेहरा, डेनझिल स्मिथ

आपली प्रतिक्रिया द्या