
आपल्या आश्रमातील साध्वीवर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला दुराचारी बाबा आणि डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला रोहतकच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राम रहीमच्या पोटात दुखू लागल्यानंतर त्याला तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आले. गुरुवारी सकाळी जवळपास 7.00 वाजल्याच्या सुमारास राम रहीम याला कडक सुरक्षेत रोहतकमध्ये आणण्यात आले. याआधी 12 मे रोजी रक्तदाबाची समस्या जाणवत असल्याने त्याला पीजीआयमध्ये आणले होते. यापूर्वी, गुरुग्रामला जाऊन आजारी आई नसीब कौर यांना भेटण्यासाठी राम रहीमने 21 दिवसांचा पॅरोल मागितला होता. परंतु, त्याला केवळ 48 तासांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. 53 वर्षीय राम रहीम याला आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत बलात्कार प्रकरणात पंचकुला स्थित सीबाआय विशेष न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तो 2017 पासून रोहतकच्या तुरुंगात बंद आहे.





























































