
सामना ऑनाईन,मुंबई
स्वातंत्र्यदिनी जिजामाता उद्यानात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिलाचा अवघ्या आठ दिवसांतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवार, 22 ऑगस्टला पिलाची प्रकृती खालावत गेली आणि रात्री या नवजात पिलाने प्राण सोडले. देशातल्या पहिल्यावाहिल्या पेंग्विनच्या मृत्यूची बातमी वाऱयासारखी पसरली आणि सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
भायखळय़ाच्या जिजामाता उद्यानातील पेंग्विनच्या जोडय़ांपैकी मोल्ट आणि फ्लिपर या जोडीतील मादी फ्लिपर हिने 5 जुलै रोजी आपल्या घरटय़ात एक अंडे दिले होते. या अंडय़ातून बरोबर 40 दिवसांनंतर 15 ऑगस्टला रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी या पिलाने जन्म घेतला. मात्र अवघ्या आठ दिवसांतच हे पिल्लू दगावले आहे. दोन्ही पालक पेंग्विन या पिलाची देखभाल करत होते तसेच त्याची वाढही होत होती. मात्र 22 ऑगस्टला या पिलाची प्रकृती ढासळत गेली. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने सर्व प्रयत्न करूनही रात्री हे पिल्लू मृतावस्थेत आढळल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱयांनी दिली.
नवजात पिलातील विसंगती,शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष
पिलाच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी दुसऱया दिवशी सकाळी परळच्या मुंबई पशुवैद्यकीय रुग्णालयात या पिलाचे शवविच्छेदन करण्यात आले. पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ञ या विभागातील प्राध्यापकांच्या पथकाने हे शवविच्छेदन केले. प्राथमिक निरीक्षणामध्ये या पिलाचा मृत्यू ‘नवजात पिलातील विसंगती’मुळे झाल्याचे म्हटले आहे. अंडय़ातील पिवळा बलक वापरला न गेल्यामुळे तसाच राहिल्यामुळे (योक सॅक रीटेंशन) तसेच यकृतातील बिघाडामुळे पिलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पेंग्विनची पिले मृत होण्याचे प्रमाण 60 टक्के
पेंग्विनच्या संदर्भातील उपलब्ध माहितीनुसार अंडी व पिले मृत होण्याचे प्रमाण 60 टक्के इतके आहे.
अंडे फलित नसणे, अंडय़ात पिलाची स्थिती योग्य नसणे, अंडय़ातून स्वतः पिल्लू बाहेर न येणे, पिलाला भरवताना पालकांना अडचणी येणे अशी विविध कारणे त्यामागे असतात.





























































