मिंधें सरकारच्या दौऱ्यासाठी जव्हारच्या गांधी मैदानाची पार दैना, मैदानावर खडी कपचीचा मारा

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य  साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी 1997 पासून वापरात असलेल्या भव्य क्रीडांगणाची सरकारने पुरती दयनीय अवस्था करून टाकली आहे. पावसाळी वातावरणात येणाऱ्या मान्यवरांच्या सुविधेसाठी या मैदानात दगड, कपची, ग्रिट व डांबराचा मारा केल्याने पंचक्रोशीतील एक महत्त्वपूर्ण मैदान खेळाच्या वापरासाठी यापुढे कुचकामी ठरणार आहे

जव्हार येथे आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी यापूर्वी सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठापेक्षा काहीपट मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर पावसाचा अंदाज पाहता सुमारे 6000 नागरिक बसतील इतका भव्य वॉटरप्रूफ मंडपदेखील उभारण्यात आला आहे. या व्यासपीठ व सभामंडळाच्या उभारणी दरम्यान क्रीडांगणाच्या मध्यभागी असलेली क्रिकेटची खेळपट्टी पार उघडली गेली असून मैदानात ठीकठिकाणी दगडाच्या राशी पडल्याचे दिसून येत आहे.

आंदोलनाचा पवित्रा

जव्हार व परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून तरुण मुलांना मोबाईलची चटक लागली असताना अशा तरुणांची तंदुरुस्ती राखण्यासाठी जव्हारवासियांनी ‘मोबाईलकडून मैदानाकडे’ अशी विशेष मोहीम राबवली होती. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनी देखील आमदार निधी मैदानाची व स्टेडियमची सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यास वेळोवेळी हातभार लावला. अशा परिस्थितीत या मैदानाची दुरावस्था केल्याने एक लढा मैदानासाठी आंदोलन खेळण्याचा जव्हारवासीयांनी निर्धार केला आहे. जव्हार व परिसरात अशा प्रकारची अनेक ठिकाणे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपलब्ध असताना जिल्हा प्रशासनाने त्याचा पुरेसा अभ्यास न करता राजीव गांधी स्टेडियमचा विचार केला याबद्दल जव्हार वासियांकडून टिका होत आहे. या कार्यक्रमानंतर मैदान पूर्ववत करावे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली असून ’एक लढा मैदानासाठी’ असे आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.