मोहोळमधील भांबेवाडी बंधाऱ्याची दुरवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेती आणि पिण्यासाठी पाणी अशा दुहेरी उपयोगासाठी सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी भांबेवाडी येथील वांगिरा ओढय़ावर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी साठून राहत नाही. परिणामी, ऐन उन्हाळ्याच्या काळात या बंधाऱ्यावर अवलंबून असणारी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे हा बंधारा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी येथे वांगिरा ओढय़ावर बांधण्यात आलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वीचा असून, त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्याच्या कठडय़ांवरील संरक्षक कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. शिवाय बंधाऱ्यावरून जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

विशेष म्हणजे, या बंधाऱ्यावर भांबेवाडी, शिरापूर, भोयरे, आष्टे, कोळेगाव, हिंगणी आदी गावांतील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. या बंधाऱ्याची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच या बंधाऱ्यातून पाण्याची गळती होऊन पाणीच शिल्लक राहत नाही. परिणामी, त्याचा फटका रब्बीतील शेती पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी बसत आहे. या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा येथील शेतकरी ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन करतील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.