बदनापूरात वाळु माफियांचा सहायक पोलीस निरीक्षकांवर स्कॉर्पिओ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

वाळू माफिया असलेला आरोपीने इतरांसोबत संगनमत करून जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत व इतरांच्या अंगावर स्कॉपिओ गाडी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व इतर आरोपी फरार आहेत. परमेश्वर शिवराम माताडे असं अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे.

बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील संजय ओंकार उगले विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात तीन महिन्यापूर्वी गावातील एका व्यक्तिस जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहे. फरार असलेला आरोपी संजय उगले हा गावात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने गुन्ह्यात संजय ओंकार उगले यास अटक करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत हे आपल्या इतर कर्मचाऱ्यांसोबत 2 जुलै रोजी साडे चार वाजता कुंभारी येथे जात होते. तेव्हा आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस येत असल्याचा सुगावा लागल्याने आरोपीने देवपिपंळगाव ते कुंभारी रस्त्यावर वाहन स्कॉपिओ सोमो क्रमांक (एम. एच. 04 एफ-ए-8143) हे वेगाने चालवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

वाळू माफिया असलेल्या संजय उगले या आरोपीने परमेश्वर शिवराम मताडे (रा. डोंगरगाव), नानासाहेब इंगळे (रा. कुंभारी) व शुभम यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतरांच्या अंगावर वाहन टाकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी स्वतःचा बचाव केला व आरोपीचा पाठलाग केला असता संजय उगले व इतरांनी पळ काढला. परमेश्वर मताडे यास व्हॅनसह पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी 2 जुलै रोजी रात्री उशिरा 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या