जबाब दिलास तर तुलाही जाळून टाकू, बलात्कार पीडितेच्या घरावर लावले पोस्टर्स

1169

उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव बलात्कार पीडितेला न्यायालयात जात असताना भर रस्त्यात जिवंत जाळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बागपत जिल्ह्यातील बलात्कार पीडितेला देखील अशाच प्रकारे जिवंत जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. पीडितेच्या घराबाहेर अशी धमकी देणाऱे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सोरानला अटक केली आहे.

बागपत जिल्हातील बिजरोल गावात राहणाऱ्या या तरुणीवर 2018 साली तिच्याच गावातील सोरान याने बलात्कार केला होता. सोरान हा सध्या जामिनावर बाहेर होता. बुधवारी या पीडित तरुणीच्या घराबाहेर काही पोस्टर्स लावण्यात आले होते व त्यावरून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘जर पोलिसांत जबाब देशील तर तुझी देखील उन्नाववाली सारखी परिस्थिती करू’, अशी धमकी त्या पोस्टर्सवरून दिलेली होती.

या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सोरानला अटक केली आहे. तसेच पीडिता व तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा देखील पुरविण्यात आली असल्याचे बागपतचे पोलीस अधिक्षक प्रताप गोपेंदर यादव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या