बैल पोळ्याच्या झडत्यांमधून मिंध्यांच्या गद्दारीवर टीका

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ

अपुरा पाऊस, पिकावर आलेले संकट अशा संकटात महाराष्ट्रातील शेतकरी सापडला आहे. बैल पोळ्याचा सण राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. कष्ट आणि यातना दूर सारून राज्यातील शेतकऱ्यांनी बैल पोळा आपापल्या परीने साजरा केला. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा बैल पोळ्याच्या निमित्ताने झडत्या लिहिल्या जातात. बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असं म्हटलं जातं आणि यातून सामाजिक, राजकीय विषयांवर भाष्य केलं जातं. विदर्भात या झडत्यांचा मुकाबला देखील रंगलेला पाहायला मिळतो. यंदाच्या बैल पोळ्याच्या झडत्या मिंधे गट, 50 खोके, गद्दारी, मराठा आरक्षण याभोवती फिरणाऱ्या होत्या.

यवतमाळ जिल्यातील बोरी अरब येथील वऱ्हाडी झडती कार नितीन वसंतराव कोल्हे यांनी खास झडत्या लिहिल्या आहेत. आणि या झडत्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यातली त्यांची सध्या गाजत असलेली झडती खालीलप्रमाणे आहे.

सत्ता रे सत्ता, तिघांची सत्ता,
बारामतीच्या तरण्या बुढ्यानं आयरी आनला आत्ता,
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
या झडती सोबतच एक नाही, दोन नाही,
तिघा तिघान लावल हो जुगाड,
त्या जुगारात धोका अन् लाचारी,
चोर चोर भाऊ भाऊ, शाव आहे हो घरी,
त्या शावाचा दणका भारी,
निवडणुकीत हिस्का अन् धोकेबाज घरी
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव ….!!!

प्रमोद भटे यांनी आर्थिक घोटाळे करून फरार झालेल्या विजय माल्ल्यावर झडती लिहिली आहे.

विडा रे विडा
पानांचा विडा
पानाच्या विड्यात
काथ अन् चुना..
चुना लावून बॅंकेला
पळाला माल्ल्या…
शेतकऱ्याच्या मानगुटीवर हो
कर्जरूपी हल्ल्या…
पडत्या भावाबाजीनं
कसं सुख लाभन
निसर्ग करते हो…
शेतकऱ्याले गाभन…
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हर हर महादेव….!!!

मराठा आरक्षणाच्या मुद्दावरूनही झडत्या लिहिण्यात आल्या असून एका झडतीत म्हटलं की,

पाटील रे पाटील, जरांगे पाटील
त्या पाटलाचा हिस्का भारी,
सरकार आलं हो जरांगे पाटलाच्या दारी,
देता आरक्षण का सोडू पाणी,
एक मराठा लाख मराठाची गुंजते महाराष्ट्रभर वाणी
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव ….!!!

सोशल मीडियावर या झडत्या व्हायरल होत असून त्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.