
हत्येच्या आरोपातील तृतीयपंथीला सत्र न्यायालयाने 20 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. पुराव्यांशी छेडछाड करू नये व साक्षीदारांना धमकावू नये, अशा अटीही न्यायालयाने जामीन देताना घातल्या आहेत. सुमित्रा देवेंद्र असे या तृतीयपंथीचे नाव आहे. गेले सात महिने सुमित्रा कारागृहात आहे. दर्द से हम दर्द तक या संस्थेकडून तिला जामिनासाठी वकील देण्यात आला.
अतिरिक्त सत्रन्यायाधीश एन. जी. शुक्ला यांच्यासमोर जामिनावर सुनावणी झाली. महिन्याच्या दुसऱया शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, असे आदेश न्यायालयाने सुमित्राला दिले आहेत. सुमित्राकडून अॅड. विशाल खैत्रे यांनी बाजू मांडली तर पोलिसांकडून अतिरिक्त सरकारी वकील मीरा चौधरी-भोसले यांनी युक्तिवाद केला.





























































