
रेखा जरे यांच्या खूनप्रकरणात 13 दिवस उलटून गेले तरीही मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेचा अद्यापि तपास लागलेला नाही. त्यातच बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी येथील न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर उद्या जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
रेखा जरे खूनप्रकरणात आजपर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीच्या शोधासाठी पाच पथके पाठविली आहेत. मात्र, 13 दिवस उलटूनही त्याचा तपास लागलेला नाही. शनिवारी पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरी व कार्यालयांमध्ये छापे टाकून काही गोष्टी हस्तगत केल्या आहेत.
दरम्यान, रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून अटकपूर्व जामीन देताना आमच्या अर्जाचा विचार करण्याची विनंती केली आहे. पोलिसांनीही सुनावणीच्या वेळी आरोपी बाळ बोठे याला समक्ष हजर करावे, असा अर्ज न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे. त्यामुळे सोमवारी बोठे हजर होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. पोलिसांनी आरोपी बाळ बोठे याला अटक करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार न्यायालयाच्या आवारात आणि बाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येऊ शकतो.




























































