
बाळासाहेब लबडे
संजीव खांडेकर यांचा ‘पोपटपंची चतुर्की जान, सुनो पार्वती शिरीभगवान’ (वर्णमुद्रा, 2024) हा दीर्घ कवितासंग्रह समकालीन मराठी कवितेत महत्त्वाचा राजकीय-सांस्कृतिक दस्तऐवज ठरतो. ही कविता स्वतंत्र रचनेची दीर्घ कविता असून एक लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सत्तेचा अखंड दीर्घ प्रवास आहे. देवाच्या हत्येपासून ते देवाच्या बाजारापर्यंत आणि शेवटी फॅसिस्ट सत्तेच्या उन्मादी राष्ट्रराजकारणापर्यंत पोहोचणारा आहे. या कवितासंग्रहाचे आकर्षक मुखपृष्ठ, बांधणी आणि एकूण सादरीकरणासोबतच आशयाच्या पातळीवरही हा संग्रह वाचकाला अस्वस्थ करतो.
कवितेची सुरुवात हिंसेच्या परिचित प्रतिमांनी होते-शस्त्रs, रक्त, अफवा, ‘तो म्हणाला/कोणी म्हणाले’ अशी कथनरचना. यातून सत्याची अनिश्चितता आणि ‘व्हर्जन’च्या राजकारणाकडे कवी लक्ष वेधतो. या पार्श्वभूमीवर येणारी ‘देव मेला’ ही घोषणा धार्मिक धक्का देण्यासाठी नसून न्याय, करुणा, विवेक आणि माणुसकी या मूल्यांच्या हत्येचे रूपक बनते. नीत्शेच्या उद् ग्s अd या तत्त्वज्ञानाशी नाते सांगत खांडेकर आजच्या सत्ताकेंद्रित, ध्रुवीकरणाने ग्रासलेल्या समाजातील नैतिक रिक्तता उघडी करतात. माध्यमांची एंट्री कवितेला तीव्र सटायर देते. देवाच्या मृत्यूचे ‘ब्रेकिंग न्यूजे’मध्ये रूपांतर होते. अँकरचा पोशाख, सादरीकरण, टीआरपी या सगळ्यात मूल्ये संपून तमाशा उरतो. पुढील भागात बुद्धाच्या मृत्यूची सावली दाखवली जाते. इथे धर्म विवेकाची जागा सोडून ‘कंटेंट’, ‘स्ट्रटेजी’ आणि करमणूक बनतो.
यानंतर देवाच्या मृत्यूने उभी असलेली धार्मिक-आर्थिक व्यवस्था कोलमडते. पुजारी, मंदिरे, प्रसाद, चमत्कार-सगळे कवडीमोल ठरते. समतेचे निर्णयही मूल्यनिष्ठ न राहता अर्थव्यवस्थेच्या दबावातून घेतले जातात. पुढे वाळव्यांचे रूपक येते. देवाच्या अंत्यसंस्कारांचा प्रश्न कविता तात्त्विक उंचीवर नेतो. विधी आहेत, पण अर्थ नाही. प्रश्न आहेत, पण उत्तर नाहीत आणि अखेरीस देवाच्या जागी सत्तेचा उन्मादी तमाशा येतो-तेहतीस कोटी चुंबने, आरशांत विद्रूप प्रतिबिंबे, जमावाचा उन्माद, ‘मंदिर वही बनाएंगे’चे नारे. इथे देव नको असतो; देवाच्या नावावर सत्ता हवी असते. फॅसिस्ट व्यवस्था बहुरूपी, जबाबदारीविरहित आणि जमाववादी बनते. राष्ट्रीय संग्रहालयात सुळ्यांच्या सावल्या बंद केल्या जातात आणि ‘बुक युवर तिकीट’ची घोषणा होते-भविष्यातील हिंसेचेही बाजारूकरण. संपूर्ण कवितेला जोडणारा श्लोक- “पोपटपंची चतुर्की जान। सुनो पार्वती शिरीभगवान।’’ हा केवळ पुनरुक्ती नसून की-वाक्य आहे. तो घोषणाबाजी, कर्मकांड, भाषिक चलाखी आणि अनुभवशून्य धर्म उघडा करतो. खांडेकर थेट उपदेश न करता दृश्य उभे करतात आणि वाचकाला नैतिक जबाबदारीसमोर उभे ठेवतात.
ही दीर्घ कविता देव, धर्म, माध्यमे, बाजार आणि सत्तेच्या संगनमताचा तीव्र आरसा आहे. दिलासा न देणारी, पण आवश्यक अशी ही काव्यकृती आपल्या काळातील फॅसिस्ट प्रवृत्तींचे भयावह दस्तऐवजीकरण करते, ज्यात पाहण्याची हिंमत वाचकाला करावी लागते.
पोपटपंची चतुर्की जान,
सुनो पार्वती शिरीभगवान
लेखक – संजीव खांडेकर
प्रकाशक – संजना प्रकाशन
मूल्य – 325 रुपये

























































