शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत विविध उपक्रम

683
balasaheb-thackeray

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, भव्य वैद्यकीय तपासणी शिबीर यांसारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याशिवाय शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिकांसाठी मोफत बिस्किटे आणि पाणीवाटपही करण्यात येणार आहे.

चेंबूरमध्ये महाआरोग्य तपासणी शिबीर

चेंबूर येथील घाटला व्हिलेज या ठिकाणीही सकाळी 10 ते दुपारी 1 यादरम्यान, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर आणि लायन्स क्लब ऑफ चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र शिबीरही होणार आहे. आरोग्य तपासणीत दंततपासणी, मधुमेह चाचणी, ईसीजी तपासणी, सामान्य तपासणी, नेत्रतपासणी, हाडांची तपासणी इत्यादी सुविधा अगदी मोफत दिल्या जाणार आहेत. संपर्कासाठी संजय जाधव ः 9167435631.

मोफत बिस्किटे आणि पाणीवाटप

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर येणाऱया शिवसैनिकांना म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने या वर्षीही मोफत बिस्किटे आणि पाणीवाटप करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकाने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सत्यवान जावकर यांनी केले आहे.

वरळीत रक्तदान शिबीर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या वरळी नाका येथील शिवसेना शाखेत 83 व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 17 डिसेंबर 2012 पासून सलग 83 महिने दरमहिन्याच्या 17 तारखेला शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीनिमित्त वरळी नाका येथील शिवसेना शाखेत सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. रक्तदान शिबिरात सहभागी होणारे रक्तदाते शिवसेनाप्रमुखांवरील श्रद्धेमुळे सात्त्विक भावनेतून रक्तदान करतात. या रक्तदान शिबिरात सर्वधर्मीय बहुभाषिक रक्तदाते सहभागी होत असतात. याशिवाय मुंबई, ठाण्यातील अनेक रक्तपेढय़ांनी येऊन या ठिकाणी यशस्वी रक्तसंकलन केले आहे. दरम्यान, उद्या 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते  दुपारी 2 या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार असून इच्छुक रक्तदात्यांनी आयोजक आणि नगरसेवक अरविंद भोसले-9821581860 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या