
सामना प्रतिनिधी । मुंबई
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून आयएएस, आयएफएस, आयपीएस, आयआरएस सेवेत जाण्याचे स्वप्न हजारो विद्यार्थी पाहतात, पण यात यशस्वी व्हायचे असेल तर संयम, सातत्य आणि चिकाटी अत्यंत आवश्यक आहे असे मार्गदर्शन आज स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभले. निमित्त होते बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांच्या गुणगौरव, कौतुक सोहळ्याचे.
‘बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी’च्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. २०१७ या वर्षात अकादमीच्या माध्यमातून सहा विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले. ‘यूपीएएससी’त यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा सत्कार ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी’च्या वतीने करण्यात आला. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, एमयूटीपीचे प्रकल्प संचालक प्रवीण दराडे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. गिरीश बडोले यांनी महाराष्ट्रातून प्रथम तर देशात २० क्रमांक पटकावला, तर रोहन जोशी हे देशात ६७ वा क्रमांक पटकावला. ‘आयएएस’ म्हणून यश मिळविणाऱया दिग्विजय बोडके, भुवनेश पाटील, पीयूष साळुंखे, रोहन जोशी, मयूर काथवटे, श्रीनिवास पाटील, तुषार गुप्ता, चंद्रशेखर घोडके, आयएफएस वल्लरी गायकवाड, आयपीएस प्रतीक खातमकर, सागर शहा, भावेश शर्मा, श्रीकांत तापडिया, संतोष माळी, स्वप्नील कोठावडे, आयआरएस हेमंत पाटील, किशोर धस, पूनम ठाकरे, महादेव धारूरकर, मैथिली कोरडे, पूजा राणावत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
प्रत्येक जिह्याचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक महाराष्ट्रप्रेमीच असावा!
प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर प्रामाणिक समाजसेवा महत्त्वाची असून जनतेची कामे करण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचे प्रवीण दराडे यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांना योग्य न्याय देण्याचे उत्तम ध्येय असेल आणि ऑटिटय़ूड पॉझिटिव्ह ठेवल्यास प्रशासकीय सेवा यशस्वीपणे करता येईल, असा सल्ला राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यार्थ्यांना दिला, तर महाराष्ट्रातला प्रत्येक जिह्याचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हा महाराष्ट्रप्रेमीच असावा हाच प्रयत्न ‘बाळासाहेब ठाकरे अकादमी’च्या माध्यमातून केला जात असल्याचे विजय कदम यांनी सांगितले.




























































