एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणार, संभाजीनगरच्या महापौरांचा निर्वाळा

940

महानगरपालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक प्रियदर्शनी उद्यानात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्यानातील एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारले जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. यासंदर्भात झाडे तोडली जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले ते निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महापौर म्हणाले.

संभाजीनगर शहरावर शिवसेनाप्रमुखांचे अतोनात प्रेम होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक शहरात उभारण्यात यावे अशी नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक प्रियदर्शनी उद्यानात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मारक उभारण्यासाठी मनपाने 65 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्या कामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. या स्मारकाकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली परंतु तत्कालीन सरकारने स्मारक उभारण्यासाठी दहा कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे पत्रकाद्वारे कळविले होते. त्यामुळे निविदा उघडण्यात आल्या नाहीत.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी प्रियदर्शनी उद्यानातील झाडे तोडली जाणार असल्याचे वृत्त निराधार असून एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील आरे शेडच्या कामासाठी झाडे तोडण्यास स्थगिती दिली. त्यांच्या भूमिकेशी सुसंगत राहूनच एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारले जाईल. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यासंदर्भात जो निर्णय देतील तो शिरसावंद्य राहील, असेही महापौर घोडेले म्हणाले. तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडले जाणार नाही असे स्पष्ट केले.

अमृता फडणवीस यांची टिव टिव
आरे कारशेडसाठी रातोरात अडीच हजारांहून अधिक झाडे कापण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाबाबत अमृता फडणवीस यांनी अवाक्षरही काढले नव्हते, मात्र फडणवीस सरकार गेल्यानंतर संभाजीनगर येथे वृक्षतोड होतेय की नाही याची खात्री न करताच अमृता फडणवीस यांनी इंग्रजी वृत्तपत्रातील एका बातमीच्या हवाल्याने टिव टिव केले आहे. वृक्षतोड ही सोयीनुसार केली जात आहे. ‘ढोंगीपणा हा एक रोग आहे. लवकर बरे व्हा!’ अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे शिवसेनेवर केली, मात्र या टीकेला शिवसेनेकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरील अमृता फडणवीस यांचे आरोप खोडून काढले. ‘मॅम सॉरी, तुम्हाला निराश करीत आहे. पण संभाजीनगरच्या महापौरांनी याआधीच स्पष्ट केलंय की एकही झाड तोडलं जाणार नाही. महत्त्वाचं म्हणजे बळजबरीने खोटं बोलणं हा सगळ्यात मोठा रोग आहे. तेव्हा लवकर बऱया व्हा. कदाचित झाडं तोडण्यासाठी कमिशन घेणं हे भाजपचं धोरण असावं’ असे ट्विट करीत चतुर्वेदी यांनी मिसेस फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय.

आपली प्रतिक्रिया द्या