
भाजप सरकारचा 5 वर्षाचा कालखंड पूर्ण होत आहे. या कालखंडात सरकारने शेतकरी, कामगार, व्यापारी व बेरोजगारी यापैकी कोणतेही प्रश्न सोडविले नाहीत. सर्व आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. काँग्रेसच्यावतीने महापर्दाफाश यात्रा काढण्यात आली असून त्याचा शुभारंभ अमरावती येथून झाला. त्यावेळी थोरात यांनी भाजपवर टीका केली.
देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याला फक्त आणि फक्त भाजप सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे थोरात म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे, अशी टीकाही थोरात यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आघाडी संदर्भात चर्चा सुरु आहे. धर्मनिरपेक्ष शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पक्षांनासोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे, म्हणूनच वंचित आघाडीसोबत चर्चा केली जात आहे. वंचित आघाडीला सोबत यायचे किंवा नाही हा त्यांचा निर्णय असल्याचे थोरात म्हणाले. देश ज्या वळणावर उभा आहे, त्या वळणावर सर्वांनीच ताकदीने लढण्याची गरज असल्याचे थोरात म्हणाले. काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेचे आयोजन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलु देशमुख यांनी केले होते, यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच नेते-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार रावसाहेब शेखावत यांनी काँग्रेसच्या या यात्रेला दांडी मारली. ते या कार्यक्रमाला उपस्थित नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू होते.
अमरावती येथील भाजपचे आमदार डॉ.सुनील देशमुख यांनी सोमवारी येथील विश्राम भवनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. प्रत्यक्षात सुनील देशमुख मुळचे काँग्रेसचे असल्यामुळे त्यांनी थोरात यांची भेट घेतली असली तरी मात्र त्याबाबतही राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
























































