नरेंद्र मोदींच्या काळात लोकशाही रसातळाला गेली; बाळासाहेब थोरात यांची टीका

मनमोहन सिंग यांच्या काळात देश रसातळाला गेला, अशी टीका करणाऱ्यांनी मोदी सरकारची कामगिरी बघावी. या तिमाहीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या जीडीपीची मोठी घसरण झाली. देश रसातळाला जाणे म्हणजे काय, हे या सरकारने दाखवून दिले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली. सिंग यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाचा विकास वाढीचा दर 7.5 टक्के राहिला, असे असताना सिंग यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला, अशी टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारची कामगरिकी बघावी, असे थोरात म्हणाले.

थोरात म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने ऐतिहासिक विकास दर गाठला. एवढेच नव्हे तर त्या विकासाचा उपयोग हा जनहितासाठी करुन 14 कोटी दारिद्र्यरेषेखाली असलेल्या जनतेला गरिबीरेषेवर आणले. यातून नवीन सकारात्मक आर्थिक वर्गवारी देशाला पहायला मिळाली. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करुन जगाच्या इतिहासात प्रथमच अन्न सुरक्षा कायदा आणला. रोजगाराची हमी देणारी मनरेगा योजना आणली. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाचा अधिकार दिला, अशी कामगिरी करणाऱ्या सिंग यांच्यावर टीका करण्याआधी फडणवीस यांनी विचार करायला हवा होता, असे थोरात म्हणाले.

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने रसातळ काय असतो, ते दाखवून दिले आहे. याच तिमाहीत देशाच्या जीडीपीने उणे 23.9 टक्के अधोगतीचा दर गाठलेला आहे. गेल्या सहा वर्षात देशाच्या विकास दराला सातत्याने उतरती कळा लागल्याचे आपण बघत आहोत. या वर्षी देशाचा विकास दर उणे 9 राहण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संस्था व्यक्त करत आहेत. गेल्या 46 वर्षातील उच्चांकी बेरोजगारीचा दर हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नोंदवला आहे. प्रती वर्षी 2 कोटी रोजगार देणार असे आश्वासन देणार्‍या मोदींनी आतापर्यंत 12 कोटी रोजगार घालवले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. जीएसटीचा परतावा राज्यांना देणे कायद्याने बंधनकारक असतानाही केंद्र सरकार हात वर करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा सपाटा सुरु आहे. बँकिंग क्षेत्र रसातळाले गेले असून बँकांना लुटणारे 38 घोटाळेबाज देश सोडून पळून गेले आहेत. देशातील अनेक उद्योगधंदे बंद होत असताना केवळ मोदींच्या काही मित्रांच्या हाती देशाचे उद्योग रहावेत असे धोरण सरकार राबवत आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचे अध:पतन झाले आहे. संवैधानिक यंत्रणांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. कामगार विस्थापित झाला,स्थलांतरीत मजुरांची अवस्था लॉकडाऊनमध्ये देशाने पाहिली आणि नोटबंदीमुळे असंघटीत क्षेत्र पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. चीन आपला भूभाग व्यापत आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या