‘संभाजीनगर’वरच्या चर्चा आता थांबवा, बाळासाहेब थोरात यांनी बजावले

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला काँग्रेसचा विरोध नाही. ते आमचे अराध्य दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे ‘संभाजीनगर’ विषयावरच्या चर्चा आता थांबवा, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बजावून सांगितले.

बाळासाहेब थोरात यांनी आज ठाण्यातील काँग्रेस कार्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना संभाजीनगरच्या चर्चेबद्दल विचारले असता ते म्हणाले, आता यावर चर्चा करण्याचे काही कारण नाही. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. महाराज आमचेही श्रद्धास्थान आहेत, यात काहीही शंका असण्याचे कारण नाही.

आमचे टार्गेट भाजपच

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय, यावर बोलताना थोरात म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत आहोत. असे असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी यात असतेच. परंतु महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक वेळी चर्चा करूनच निर्णय होईल. भाजपची विचारसरणी आम्हाला मान्य नाही. त्यामुळे भाजप हेच आमचे टार्गेट आहे आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्षपद तरुण नेतृत्वाच्या हाती द्या!

मी काँग्रेसचा विधिमंडळ नेता आणि महसूल मंत्रीही आहे. सहाजिकच इतकी पदे एका व्यक्तीकडे असतील तर जबाबदारीचे विभाजन व्हावे, असे श्रेष्ठींना वाटले असेल तर मीही तयार आहे. प्रदेशाध्यक्षपदाची संधी त्यांनी तरुण नेतृत्वाला द्यावी आणि नवे नेतृत्व घडवावे.

आपली प्रतिक्रिया द्या