
‘शहरातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्याचे काम चांगले झालेले दिसत आहे; परंतु काही ठिकाणी मला आदळत-आपटत प्रवास करावा लागला. रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची करा. ठेकेदारांना तशा सूचना द्या. दोन वर्षांत रस्ते फुटतील अशी कामे करू नका. जनता आपल्यालाच नावे ठेवते, ठेकेदारांना नाही. ठेकेदार आपलेच असले तरी दर्जाशी मात्र तडजोड करू नका,’ अशा कानपिचक्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठेकेदारांसह पालिका पदाधिकाऱयांना दिल्या.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग 1 ते 14मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, बंदिस्त गटारे, ट्रिमिक्स काँक्रीटीकरण, आमदार डॉ. सुधीर तांबे शॉपिंग कॉम्प्लेक्स यांसह विविध विकासकामांचा शुभारंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विश्वास मुर्तडक, सुनंदा दिघे, वृषाली भडांगे, नगरसेवक बाळासाहेब पवार, दिलीप पुंड, सोनाली शिंदे, कुंदन लहामगे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, कोरोना, ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळे अशा संकटांतही महाविकास आघाडी सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला असून, संगमनेर शहर व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी दिला आहे. त्यातून शहरातील विविध गार्डन, चांगले रस्ते, अद्ययावत इमारती, हायटेक बस स्थानके, बायपास, प्रवरा नदीवर विविध पूल, क्रीडा संकुल असे अनेक मोठमोठी विकासकामे मार्गी लागली आहेत. शहरासाठी सुमारे दीडशे कोटींच्या निधीतून नव्याने विविध रस्ते, बंदिस्त गटारे, कवी अनंत फंदी खुल्या नाटय़गृहाचे बंदिस्तीकरण अशी विविध कामे होणार आहेत. ही सर्व कामे उच्च व चांगल्या दर्जाची करताना शहराच्या वैभवात आणखी भर पडेल यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर निळवंडे कालव्याच्या कामाला गती दिली. येत्या 2022मध्ये पावसाळ्यातील पाणी कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला देण्याचा आपला मानस आहे. संकटे आली नसती तर अजूनही मोठा निधी मिळविता आला असता, असेही ते म्हणाले.
रेल्वे कुठुन जाणार ते मलाच माहित नाही
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर तालुक्यातील नेमके कुठून जाणार आहे, हेच मला अजून समजलेले नाही. कधी म्हणतात देवठाण, कधी म्हणतात वडगाव पान, कधी म्हणतात सायखिंडी अशी ठिकाणे चर्चेत येत आहेत. मात्र, रेल्वे कुठूनही जावो चांगल्या मार्गाने आणि चांगली व्यवस्थित जावो हीच आपली अपेक्षा असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले.





























































