बालभारतीला सुखदेव यांच्या नावाचा विसर, आठवीच्या मराठीच्या पाठात अक्ष्यम्य चूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भगतसिंग, राजगुरू यांच्यासह लाहोर तुरुंगात फासावर लटकलेले थोर क्रांतिकारक सुखदेव यांच्या नावाचा बालभारतीला विसर पडला आहे. बालभारतीच्या आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील एका धडय़ातून स्वातंत्र्यसेनानी सुखदेव यांचे नाव वगळण्यात आले आहे. या धडय़ात भगतसिंग, राजगुरू आणि पुरबान हुसेन यांनी देशासाठी बलिदान दिले असे म्हटले आहे; मात्र भगतसिंग, राजगुरू यांच्याबरोबरीने लढलेल्या सुखदेव यांना देशभक्त म्हणून या धडय़ात स्थान दिलेले नाही.

बालभारतीच्या या कारभारावर सध्या नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून या मराठीच्या पुस्तकाचा आठवीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यास मान्यता दिली. या पुस्तकात ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ हा दुसऱया क्रमांकाचा धडा आहे. लेखक यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा’ या पुस्तकातून हा धडा घेण्यात आला आहे. या धडय़ात भगतसिंग, राजगुरु, पुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते, असा उल्लेख आहे. मात्र या नावांमधून सुखदेव यांचे नाव वगळण्यात आले आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये 23 मार्च 1931 रोजी फासावर चढवण्यात आले होते. इतिहासामध्ये या तीनही स्वातंत्र्यसेनानींचा एकत्रितपणे उल्लेख आहे. त्यामुळे बालभारतीने पुस्तकामधून सुखदेव यांचे नाव का वगळले, असा सवाल उपस्थित होत आहे.

बालभारतीने मूळ पुस्तकातील संकल्पना मांडली आहे
मराठीच्या पुस्तकातील या धडय़ात क्रांतिकारकांची माहिती अभिप्रेत नाही, असा खुलासा बालभारतीने केला आहे. देशप्रेम भावना जाणीवजागृतीबाबत वर्गातील विद्यार्थ्यांशी झालेली आंतरक्रिया या ध़ड्यातून मूळ लेखकाने मांडलेली आहे. ती मूळ पुस्तकात जशी मांडलेली आहे तशीच घेण्यात आली आहे. त्यामुळे या पाठातून कोणत्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण पाठय़पुस्तक मंडळाचे प्र संचालक विवेक गोसावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.