बालभवन इमारतीच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुमारे 70 वर्षे जुन्या मरीन लाइन्स समुद्रकिनारी उभ्या असलेल्या जवाहर बालभवन इमारतीच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला. बालभवनची इमारत जीर्ण झाली असून इमारतीस दुरुस्तीची आवश्यकता आहे. मुलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन या ऐतिहासिक इमारतीच्या नूतनीकरणाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

बालभवनमध्ये 4 ते 16 वयोगटातील मुलांसाठी संगीत, नाटय़, चित्रकला, शिल्पकला, तबला, अशा विविध छंदवर्गाचे आयोजन अत्यंत माफक फीमध्ये वर्षभर करण्यात येते. बालभवनची इमारत ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद करून सदर वास्तू आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यावर भर असल्याचे यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

बालभवनची इमारत मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या अशा मरीन लाइन्स परिसरात आहे. या वास्तूचे अशा प्रकारे नूतनीकरण करावे की लोकांना बघताक्षणी बालभवनची इमारत ओळखता येईल. यासाठी शिक्षण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱयांनी एकत्रित बसून आपापल्या संकल्पना मांडाव्यात व त्यानुसार पुढील कार्यवाहीची रूपरेषा आखून काम करावे, अशी सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी केली. याप्रसंगी राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान कैलास पगारे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग हांडे सर, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे उपस्थित होते. बालभवनचे संचालक आर. एस. नाईकवाडी यांनी आभार प्रदर्शन केले.

इमारत दुरुस्तीमध्ये संपूर्ण इमारतीचे मजबुतीकरण, आतील व बाहेरील बाजूने प्लास्टर, नादुरुस्त दरवाजे, खिडक्या बदलणे, स्वच्छतागृहाचे नूतनीकरण, प्लंबिंग व विद्युतीकरणाचे नूतनीकरण करणे व संपूर्ण इमारतीस रंग देणे आदी कामे होणार आहेत. बालभवनच्या पहिल्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम तर दुसऱया मजल्यावर विविध छंद वर्गांकरिता स्वतंत्र कला दालने निर्माण करणे प्रस्तावित आहे. या कामाचा आराखडा तयार करण्याचे काम सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील आर्किटेक्चर विभाग करीत आहे.