
नमिता वारणकर,[email protected]
‘बलुतं’ ही सुप्रसिद्ध लेखक पद्मश्री दया पवार यांची कादंबरी… नुकतीच या साहित्यकृतीला 40 वर्षे पूर्ण झाली… त्यानिमित्ताने…
समाजाला जगण्याचं बळ देणाया साहित्यकृतीच जिवंत राहतात… अनेकांना त्यांच्या वाचनातून प्रेरणा मिळते… यामुळेच त्या इतिहास घडवतात… याचं एक अक्षर उदाहरण म्हणजे ‘बलुतं’ हे सुप्रसिद्ध लेखक पद्मश्री दया पवार यांचं आत्मकथन… नुकतीच या साहित्यकृतीला 40 वर्षे पूर्ण झाली… वंचितांचं, दलितांचं जगणं प्रस्थापित मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आणणारं हे आत्मकथन एक वेगळं सौंदर्यविधान निर्माण करणारं आहे. बलुतंच्या निर्मितीनंतर अनेकांना लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली हेच या पुस्तकाचं वेगळेपण आणि यश. दया पवार यांचे कोंडवाडा, पाणी कुठवर आलं ग बाई हे कवितासंग्रह, जागल्या, चावडी, पासंग हे ललित-वैचारिक लेखन, विटाळ हा कथासंग्रह, एकला चलो रे हे प्रवासवर्णन – ही सगळी साहित्यसंपदाही तितकीच वाचनीय… आजही वाचकांना वेगवेगळ्या टप्प्यावर ही पुस्तकं नवा दृष्टिकोन देत राहतात.
‘बलुतं’ या आत्मकथनाला केवळ दलित साहित्यातच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्यात एक वलय प्राप्त झालेलं आहे. त्याच्या ज्येष्ठ कन्या व सुप्रसिद्ध कवयित्री – लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार बलुतंविषयी बोलताना म्हणतात, 24 डिसेंबर 1978 रोजी बलुतंची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर आजवर अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. याशिवाय जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, कन्नड, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये ते अनुवादित झालं. फोर्ड फाउंडेशनने या साहित्यकृतीचा गौरव केला. चाळीस वर्षांनंतरही ‘बलुतं’सारखी साहित्यकृती स्वतःचा करिष्मा राखून आहे. त्यांची मुलगी आणि साहित्याची एक अभ्यासिका म्हणून मला याचा अतीव आनंद वाटतो. लेखनात जर ताकद असेल, सच्चेपणा असेल, प्रांजळपणा असेल, द्रष्टेपण असेल आणि नव्या वाटा धुंडण्याची आस त्यामध्ये असेल तर नक्कीच काळाला ओलांडून त्या पुढे जाणाऱया असतात, नवे मानदंड निर्माण करणाऱया असतात. आजचा युवा वर्गही ‘बलुतं’कडे खेचला जातो हे त्याचंच निदर्शक आहे. एखादी साहित्यकृती आमूलाग्र बदल घडवते, इतिहास घडवते हे मराठीत खूप कमी साहित्यकृतींच्या संदर्भात दिसतं. ‘बलुतं’ने नेमकं हेच घडवलेलं आहे.
डॉ. प्रज्ञा पवार पुढे म्हणतात, बलुतं जेव्हा लिहिलं जात होतं तेव्हा मी शाळकरी वयात म्हणजे चौथीत होते, पण तेव्हाही आपले वडील काहीतरी वेगळे आहेत, कवी, लेखक आहेत याची जाणीव मला होती. कारण त्यांचा ‘कोंडवाडा’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. ‘कोंडवाडा’चीही त्या काळी बरीच चर्चा होती. त्याला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीचा कवी केशवसुत पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांचं ‘बलुतं’ हे दुसरं पुस्तक. त्या वयातही वाचनाची आवड असल्यामुळे वही किंवा कागदावर या पुस्तकाचं लिहिलेला पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट मी अत्यंत उत्सुकतेने वाचायचे – कळत नसलं तरी. वडील रात्ररात्र जागून, पहाटे लवकर उठून काय लिहितात असा प्रश्न पडायचा. जसजशी मोठी झाले आणि ‘बलुतं’ची चर्चा व्हायला लागली, वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक त्यावर बोलू लागले, मांडणी करू लागले. पु. ल. देशपांडे यांनी ‘बलुतं’ प्रसिद्ध झाल्यावर वर्तमानपत्रात एक दीर्घ लेख लिहिला होता. मी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ‘बलुतं’ वाचलं. बलुतंने मला समाजवास्तवाकडे बघण्याची नेमकी दृष्टी दिली. ही एक अशी साहित्यकृती आहे की, त्या साहित्यकृतीतून अनेकांना आपणही आपलं जगणं आपल्या बोली भाषेत, रोजच्या जगण्याच्या भाषेत रेखाटू शकतो याचं बळ दिलं. कष्टकरी-आदिवासी समाज, भटके विमुक्त, स्त्रिया मोठया प्रमाणात लिहू लागल्या. त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण हे प्रखरपणे मांडले जाऊ लागले. त्यामुळे बलुतं हे दलित साहित्य चळवळीतील अग्रणी पुस्तक मानलं जातं.
या आत्मकथनाच्या माध्यमातून मांडलेला जातीय संघर्ष आता चाळीस वर्षांनंतर संपलाय असं वाटतं का, असं विचारता प्रज्ञा म्हणतात, ‘बलुतं’मधील नायकाला ज्या प्रकारचे जातीयतेचे चटके त्या काळात सोसावे लागले, त्यापेक्षा आजचा काळ निराळा आहे. जातवास्तवाचे स्वरूप बदलले आहे. पण प्रश्न संपले असे दिसत नाही. कारण बदलाची प्रक्रिया अत्यंत धिमी आहे. आजची जातीयता बलुतंच्या काळातल्या जातीयतेपेक्षा अधिक भीषण झाली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिकीकरण आणि वाढता धर्मवाद होय. त्यातून जातीचे प्रश्न जास्त टोकदार झालेत. याची अनेक उदाहरणे बघता येतील. अशा वेळी बलुतंसारख्या साहित्यकृतीची अधिकच गरज भासते. कारण ती समाजाला संघर्षप्रवृत्त करण्याची दिशा देते.
नवोदितांना मार्गदर्शक
नवोदितांचं लेखन आणि बलुतं याबद्दल बोलतना डॉ. पवार म्हणतात, ’’आज लिहू पाहणायांच्या पुढच्या वाटा ‘बलुतं’मुळे अधिक मोकळ्या झाल्या, त्यांना दिशा मिळाली. ‘बलुतं’च्या खांद्यावर उभं राहून ते वर्तमान बघत आहेत त्यामुळे त्यांना तो अधिक लख्खपणे दिसत आहे.’’
‘बलुतं’मुळे हिंदीतही दलित साहित्य
अलिकडेच इंग्रजीमध्ये जेरी पिंटो यांनी बलुतंचा अनुवाद केला. तर हिंदीतला अनुवाद दया पवार असतानाच झालेला होता. परिणामी हिंदी भाषेत दलित साहित्य निर्माण व्हायला लागलं. दलित साहित्याचं बीज या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदीत पेरलं गेलं, असं खचितच म्हणता येतं. त्यामुळे हिंदी भाषेतही अतिशय सशक्त अशा दलित आत्मकथा प्रसिद्ध झाल्या. जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजीत अनुवादित झाल्यामुळे बलुतंला एक मोठा कॅनव्हास मिळाला. काही दिवसांपूर्वीच ग्रंथालीच्या प्रकाशकांनी मला सांगितलं की, ‘बलुतं’ ही आमची अशी साहित्यकृती आहे की, जी प्रकाशित झाल्या झाल्या तिच्या आवृत्त्या संपतात.
























































