
आपल्या देशातील ग्रामव्यवस्थेमध्ये पूर्वी बलुतेदारीची पद्धत होती. शेतकरी व अन्य गावकरी यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी बलुतेदारांचे काम महत्त्वाचे होते. मात्र बदलत्या जीवनशैलीत गावात बारा बलुतेदार सापडणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गतसंस्कृती नव्या पिढीला समजावी म्हणून सांगलीतील एका अभियंत्याने गणरायासमोर बारा बलुतेदारांचा देखावा साकारला आहे. हा देखावा आकर्षणाचा विषय ठरला आहे.
मिरज तालुक्यात खाडीलकर लेन, बालगंधर्व नाटय़गृहाजवळ राहणारे सुदन जाधव मेकॅनिकल इंजिनीयर आहेत. याआधीही त्यांनी शिवकालीन देखावे, मंदिर साकारले आहे. या वर्षी गणेशोत्सवात सुदन जाधव यांनी बारा बलुतेदारी संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. त्यांनी बलुतेदारांच्या आकर्षक मूर्ती आणि त्यांची जीवनशैली देखाव्यातून साकारली केली आहे. सुदन जाधव म्हणाले, लोकांचा ऑनलाईन शॉपिंगकडे जास्त कल दिसत आहे. कुंभारांच्या मडक्यांपासून लाकडी वस्तू सारंच ऑनलाईन विक्रीला दिसतं. स्थानिक कारागिरांकडून खरेदी होत नाही. बारा बलुतेदारांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मी हा देखावा उभा केला.
काय बघाल?
देखाव्यामध्ये ग्रामजीवन, मातीची घरे, भांडी, शेती, धान्याची कोठारे, लोहाराच्या हातातील हातोडे, सुताराची अवजारे, कुंभारकला, शिंप्याच्या हातातील सुई-धागा, मंदिरातील पूजाअर्चा करणारा गुरव अशा एकूण 12 बलुतेदारांचे काम, याशिवाय घरासमोरील अंगण, झाडे, पारावरचा कट्टा, दळणवळणाची साधने आदी ग़ावातील गोष्टी बघता येतात.
इकोफ्रेंडली सजावट
सुदन जाधव यांनी शाडूची माती, पुठ्ठा, पेपर, वॉटर कलर, जाड दोरा, लाकडी भुसा, कापड आदींपासून पर्यावरणपूरक देखावा तयार केला आहे. बलुतेदारांच्या मूर्ती महिनाभरापूर्वी बनवून ठेवल्या होत्या. तर रंगकाम गणेशाचे आगमन होण्याच्या आठवडाभर आधी केल्याचे जाधव यांनी सांगितले.






























































