बामणगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, चंद्रकांत पाटील सरपंच पोटनिवडणुकीत विजयी

2219

अलिबाग तालुक्यातील बामणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी शेकापचे सरपंच पदाचे उमेदवार अनंत थळे यांचा 79 मताने पराभूत करून विजयी झाले. तर सदस्य पदी शेकापच्या निकिता राऊत विजयी झाल्या आहेत. पोयनाड ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणुकीत शेकापच्या मोनाली चवरकर या सदस्यपदी निवडून आले आहेत.

बामणगाव ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार राऊत यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे त्याचे सरपंच पद जिल्हाधिकारी यांनी रद्द केले होते. त्यानंतर बामणगाव सरपंच पदाची पोटनिवडणूक लागली होती. शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील आणि शेकापचे अनंत थळे यांच्यात सरपंच पदाची सरळ लढत झाली होती. तर सदस्यपदासाठी सेनेकडून ज्योती राऊत तर शेकापकडून निकिता राऊत निवडणुक रिंगणात उतरले होते. पोयनाड ग्रामपंचायतीसाठीही सदस्य पदासाठी पोटनिवडणूक मतदान 8 डिसेंबर रोजी पार पडले.

अलिबाग तहसीलदार कार्यालयात सकाळी अकरा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. बामणगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांना 836 तर अनंत थळे यांना 757 मते पडली. चंद्रकांत पाटील हे 79 मताने सरपंच पदी निवडून आले. सदस्यपदाच्या मतमोजणीत सेनेच्या ज्योती राऊत याना 224 तर शेकापच्या निकिता राऊत याना 256 मते पडली. सेनेच्या राऊत यांचा अवघ्या 32 मताने पराभव झाला. पोयनाड ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत सेनेच्या वैभवी चवरकर यांना 283 तर शेकापच्या मोनाली चवरकर याना 348 मते पडली असून मोनाली चवरकर हा 65 मताने विजयी झाल्या. बामणगाव ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकल्याने शिवसैनिकांनी तहसीलदार कार्यालयासमोर घोषणा देऊन जल्लोष केला.

आपली प्रतिक्रिया द्या