
जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱया; परंतु बांधावरील दुर्लक्षित असलेल्या बांबू शेतीकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. राज्यात 15 हजार एकरांवर बांबूची लागवड झाली आहे.
बांबू लागवडीला गती येण्यासाठी राज्यात अटल बांबू योजना व राष्ट्रीय बांबू मिशन योजनेतून लागवड केली जाते. आतापर्यंत राज्यात 6 हजार हेक्टरवर लागवड झाली असून, त्यात दोन वर्षांत 984 शेतकऱयांनी 656 हेक्टरवर अटल बांबू योजनेतून, तर 5 हजार 185 लाभार्थ्यांनी 5 हजार 381 हेक्टरवर राष्ट्रीय बांबू मिशन योजनेतून लागवड केली आहे. यात प्रामुख्याने कोकण, नगर, लातूर, धाराशिव, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्यात बांबूचे क्षेत्र वाढत आहे. राज्यात 2019-20 मध्ये 3 हजार 486 हेक्टरवर बांबू लागवड करण्यात आली होती. तर, कोरोनामुळे 2020-21 या वर्षात 2 हजार 551 हेक्टरवर लागवडी झालेल्या आहेत.
नाशिक विभागात आतापर्यंत 481 शेतकऱयांनी 470 हेक्टर बांबू लागवड केली आहे. विभागात गेल्यावर्षी 2 लाख 6 हजार आठशे, तर यंदा 1 लाख 74 हजार बांबू रोपांची लागवड झाली आहे. बांबू लागवडीसोबत महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत ‘कॅपिटल इन्व्हेसमेंट सबसिडी’ या योजनेतून बांबूवर आधारित खासगी बांबू उद्योग प्रकल्पासाठी अनुदान दिले जात आहे. नाशिक भागातील शेतकऱयांना माहिती मिळावी, यासाठी अभ्यास दौरेही केले जात आहेत.
नगर जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग
नाशिक विभागात एकूण पाच बांबू प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर या दुष्काळी तालुक्यात बांबू लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. कर्जत तालुक्यातील टाकळी खांडेश्वरी, जाफाबाद (ता. श्रीरामपूर) येथे अगरबत्ती तयार करण्यासह अन्य प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. पाच उद्योगांसाठी एक कोटी दहा लाखांचा निधी असून, त्यातील 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. बांबूत सुबाभळीची लागवड हा राज्यातील पहिला प्रयोगही डॉ. दिलीप बागल यांनी कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे केला आहे.
हॅशटॅग प्लाण्ट बांबू मोहीम
विश्व बांबू संघटनेतर्फे चालूवर्षी ‘हॅशटॅग प्लाण्ट बांबू’ अशा नवीन हॅशटॅगची घोषणा करण्यात आली आहे. बांबू लागवड, महत्त्व व त्यासंबंधी उपक्रम व संधी यावर जनजागृती करण्यात येत आहे.
बांबूचा समुचित विकास करणे व तसेच बांबूच्या क्षमतेचा सामान्य, गरीब जनतेला आर्थिक व सामाजिक विकास करून देश विकासाला चालना देण्याचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त शेतकऱयांनी बांबूची लागवड करावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत.
– भास्कर पवार, समन्वयक, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, नाशिक विभाग.
दुष्काळी भागासाठी बांबू फार फायदेशीर आणि शाश्वत उत्पन्न देणारे पीक आहे. मी स्वतः आठ एकरवर लागवड केली आहे. मागणी चांगली असल्याने लागवड करणे गरजेचे आहे. जागतिक बांबू दिनानिमित्त जास्तीत जास्त शेतकऱयांनी लागवड करावी, अशी अपेक्षा आहे.
– डॉ. दिलीप बागल, बांबू उत्पादक शेतकरी, नांदगाव, कर्जत.


























































