
सामना प्रतिनिधी, राहुरी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याने एस.टी.बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. राहुरी बस स्थानकात सकाळी ९ वाजेपर्यंत एकही एस.टी.बस दाखल झाली नसल्याने गुरुवारप्रमाणे आज शुक्रवारी सकाळी देखील बस स्थानकाच्या परिसरात सामसुम वातावरण निर्माण झाले आहे. एरव्ही सकाळी साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत राहुरी स्थानकात पुणे, नगर, श्रीरामपुर, नाशिक, मनमाड या दिशेला जाण्यासाठी ४५ ते ५० बसेस दाखल होत असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे.
शुक्रवारी सकाळी पहाटेपासूनच प्रवासी बस स्थानकावर दाखल झाले. मात्र सकाळी ९ वाजेपर्यंत एकही बस स्थानकात आली नाही. आज सकाळी नगर मनमाड राज्य मार्गावर देखील तुरळक वाहनांची ये-जा सुरू होती. बाहेरगावी जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मिळेल त्या खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागला.






























































