बीडमध्ये जातीय द्वेषाचा ज्वालामुखी खदखदतोय! परळीत मुंडे समर्थकांचा बंद तर शिरूरमध्ये जरांगे समर्थकांचा मोर्चा

लोकसभा निवडणुकीनंतर बीडमध्ये जातीय द्वेषाचा ज्वालामुखी खदखदत आहे. मुंडे समर्थक आणि जरांगे समर्थकांमध्ये पेटलेल्या सोशल वॉरमुळे जिल्हय़ात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. गेल्या 24 तासांत जातीय तणावाचे 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ शिरूर, परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर शिरूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये मराठा समाजाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.

बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जातीय तणावाच्या भयग्रस्त वातावरणातच पार पडली. प्रचाराचा संपूर्ण कालखंड जातीय द्वेषाने खदखदत होता. परंतु दोन गटांमधील ही सुप्त लढाई आता सोशल मीडियाच्या मैदानावर खेळली जात आहे. जिल्हय़ातील काही गावांमध्ये एका गटाने दुसऱया गटावर सामाजिक बहिष्कार घालण्याची भाषा केली. त्यानंतर हे वातावरण अधिक चिघळले. दरम्यान, शिरूरमध्ये बंददरम्यान मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बीडमध्ये आज शेकडो मराठा तरुणांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेऊन कारवाईसाठी निवेदन दिले.

z सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर पथक बसवण्यात आले आहे. या पथकाने दोन दिवसांत 12 गुन्हे दाखल करून काही जणांना अटकही केली.

परळी कडकडीत बंद

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल समाज माध्यमात टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर आज रविवारी परळी वैजनाथ येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. आज परळीची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. सकाळी भगवान बाबा चौकातून मोटरसायकल रॅली काढत सकल ओबीसी समाजबांधवांनी परळी बंद ठेवण्याचे आवाहन केले. या बंदला परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंदच्या पार्श्वभूमीवर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

पंकजा मुंडे समर्थकांनी बंद पुकारला

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. मुंडे समर्थकांनी बीड बंदचा नारा दिला. पाथर्डी, शिरूरनंतर आज परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला. सोमवारी वडवणी बंदचीही हाक देण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱयाविरोधात तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मुंडे समर्थकांची मागणी आहे.