वांद्रे-धारावीत शनिवारी-रविवारी पाणी नाही, अप्पर वैतरणा जलवाहिनीच्या जोडणीचे काम होणार

231

धारावी येथे अप्पर वैतरणाच्या जलवाहिनी जोडणीचे काम दोन दिवस चालणार असल्याने वांद्रे आणि धारावी येथे शनिवार आणि रविवारी पाणीपुरवठा होणार नाही. जोडणीचे काम शनिवार, 18 जानेवारीच्या दुपारपासून ते रविवार, 19 जानेवारीच्या दुपारपर्यंत चालणार असल्यामुळे वांद्रे-धारावी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पालिकेच्या वतीने धारावी येथे 1500 मि.मी. व्यासाची आणि 1450 मि.मी. व्यासाच्या अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार व रविवारी ‘जी/उत्तर’ आणि ‘एच/पूर्व’ विभागांत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी जी/उत्तर विभागातील धारावी येथील धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए. के. जी नगर रोड, कुंभारवाडा, संत गोरा कुंभार रोड व दिलीप कदम मार्ग येथील सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच रविवारी प्रेमनगर, नाईकनगर, 60 फिट रोड, जस्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फिट रोड, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोड येथील सकाळी 4 ते दुपारी 12 या वेळेतील पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच एच-पूर्व विभागातील वांद्रे टर्मिनस परिसरात शनिवारपासून रविवार दुपारपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या