वांद्रे पूर्व विभागाची पाणी तुंबण्यातून सुटका, पालिकेच्या कामामुळे रहिवाशांना दिलासा

442

अतिवृष्टी झाल्यास लोकवस्तीत येणारे मिठी नदीचे पाणी रोखण्यासाठी बसवण्यात आलेल्या पूरनियंत्रण झडपा, नालेसफाई आणि आवश्यक पावसाळापूर्व कामे परिणामकारकरीत्या केल्यामुळे वांद्रे पूर्व विभागाची पाणी तुंबण्यातून सुटका झाली आहे. या ठिकाणी बुधवारी एकाच दिवसात 300 मिमी पाऊस होऊनही पाणी तुंबण्याचे प्रकार घडले नाहीत. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आणि पालिकेच्या माध्यमातून प्रभागात करण्यात आलेल्या कामामुळे हजारो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

वांद्रे पूर्व प्रभागात अतिवृष्टी झाल्यास मिठी नदीचे पाणी प्रवाह सोडून बाहेर येण्याचे प्रकार घडत होते. यामध्ये समुद्राला भरती असताना जोरदार पाऊस झाल्यास पाणी तुंबण्याचे प्रकार जास्त घडत होते. यामुळे परिसरातील अनेक भागांतील नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आणि परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी विभागातील कलानगर, सरकारी वसाहत, गांधीनगर, खेरनगर, जयहिंद नगर, जवाहर नगर, इंदिरा नगर, मराठा कॉलनी, पटेल नगर, हनुमान टेकडी, गोळीबार, डवरी नगर भागात पाणी तुंबू नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध काम करण्यात आले.

यामध्ये मिठी नदीचे पाणी उलट येऊ नये यासाठी बसवण्यात आलेले ‘फ्लड गेट्स’ महत्त्वपूर्ण ठरले. याशिवाय कलानगर परिसरात पूर नियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी साहित्य सहवास, आक्वेर्ड इमारत, ‘मातोश्री’ मैदान, जगत्विद्या सोसायटी येथे स्वतंत्र पंपही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे विभागात बुधवारी तब्बल 300 मिमी पाऊस होऊनही पाणी तुंबले नाही. शिवसेना नगरसेवक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलेला पाठपुरावा आणि पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे संपूर्ण वांद्रे पूर्व विभागाची पाणी तुंबण्यातून सुटका झाल्याची माहिती विधानसभा समन्वयक अनिल त्रिंबककर यांनी दिली.

असे केले काम…
पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱया ठिकाणी पंप बसवून पूर नियंत्रण झडपा कार्यान्वित करण्यात आल्यामुळे संपूर्ण विभागाला मोठा फायदा झाला. यामध्ये नंदादीप कल्व्हर्ट, ओएनजीसीजवळ ग्रीन रोड नाला येथे 2 ठिकाणी 3 पंप बसवून पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली.

शीव धारावी आऊट फॉल, एमएमआरडीए कार्यालयाजवळील जतवन उद्यान, बीकेसी मेट्रो आऊटफॉल, हरी मंदिर रोडलगतच्या दोन्ही पर्जन्य जलवाहिन्या, बीकेसी इंदिरा नगर आऊटफॉल येथे फ्लड गेट्स आणि उच्च क्षमतेचे पाणी उपसणारे पंप बसवण्यात आले आहेत. या संपूर्ण कामासाठी 10 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या