
पावसाळा ऋतू हा कलावंत मनासाठी सृजन प्रेरणा देणारा आहे. पहिल्या पावसातील मुग्ध करणारा मातीचा गंध, मनमोहक हिरवागार निसर्ग, रस्त्यावरील धुसर मिणमिण दवे, अंधारातही चमकणारे रोड, पावसात स्वच्छ न्हावून निघालेली झाडं, आकाशातील इंद्रधनुष्याचा खेळ एकूणच पावसाळय़ातील रोमँटिक वातावरण कलावंतांना भुरळ घालतं. मुंबई आर्ट सोसायटीने या वर्षीपासून मान्सून कला प्रदर्शन आयोजित केले आहे. मान्सून प्रदर्शनात एकूण 63 चित्र-शिल्पकारांच्या 120 कलाकृती रसिकांना पाहता येईल. प्रदर्शन 10 ऑगस्टपर्यंत वांद्रे येथे मुंबई आर्ट सोसायटीत पाहता येईल.
मुंबई आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, देशात दृश्य कलेसाठी कुठलेही कलादालन नव्हते तेव्हापासून सोसायटीतर्फे कला प्रदर्शने भरवून दृश्य कलेचा प्रचार व प्रसाराचे काम करत आहे. त्यात या वर्षापासून भरवल्या जाणाऱया पावसाळी प्रदर्शनाची भर पडली आहे. तरुण चित्र-शिल्पकारांना व्यासपीठ मिळावे हा उद्देश सोसायटीच्या बहुतेक कला उपक्रमांमध्ये राहिलेला आहे, परंतु नामवंत आमंत्रित चित्र-शिल्पकारांच्या कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन सोसायटी प्रथम भरवत आहे.
काय पाहाल
प्रदर्शनात चित्रकार वासुदेव कामत, विजय आचरेकर, रावसाहेब गुरव, डी. एस. राणे, शुभ गोखले, सुजाता आचरेकर, अनंत ननकम, पांडुरंग ताठे, जयश्री पाटणकर, शिल्पा निकम, रवींद्र पवार, रामजी शर्मा, रत्नदीप अडीवरेकर, रमेश थोरात, उत्तम चापटे तर शिल्पकार उत्तम पाचारणे, रतन सहा, दीपक पौनीकर, एम. पी. पवार, नितीन मिस्त्राr, प्रदीप कांबळे यांचे काम पाहायला मिळेल.

























































