
मुलांसाठी आकर्षक खेळणी असलेले अद्ययावत मैदान, हेरिटेज लूकचे दिवे आणि तलावाच्या समोरील भाग मूळ बेसॉल्ट स्टोनच्या स्वरूपात तयार केल्याने आता बाणगंगा परिसराचे रूपडे पालटले आहे. यासाठी सीएसआर फंडाच्या माध्यमातून सुमारे एक कोटीचा खर्च केला आहे. सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी ही माहिती दिली.
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. या ठिकाणाचे धार्मिक दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने पर्यटक, भाविक येत असतात. बाणगंगा तलावाच्या आतले काम, देखभाल पुरातत्व विभागाकडून करण्यात येते आणि तलावाचे व्यवस्थापन ट्रस्टच्या माध्यमातून चालते. तर परिसराच्या बाहेरील बाजूचा परिसर पालिकेच्या ताब्यात असल्यामुळे या भागाचे सुशोभीकरण, देखभाल-दुरुस्ती पालिका करीत आहे. सद्यस्थितीत या भागातील साधे दिवे बदलून हेरिटेज स्वरूपाचे दिवे लावण्यात आले आहेत. तर 160 चौरस मीटर मैदानाची दुरुस्ती करून मुलांसाठी दर्जेदार खेळण्याचे साहित्य बसवण्यात आले आहे.
बेकायदा बांधकामे तोडली
बाणगंगा परिसरात असलेल्या दीपस्तंभाशेजारी चारही बाजूंनी असलेली 15 बांधकामे पालिकेच्या माध्यमातून तोडण्यात आली आहेत. यामध्ये पात्र असलेल्यांची तात्पुरती व्यवस्थाही करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसराला नवी झळाळी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात या परिसरात बेकायदा बांधकामे होणार नाहीत यासाठी देखरेख ठेवून आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.































































