बांगलादेशमध्ये डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या; अन्यथा परिस्थिती बिघडेल, लष्करप्रमुखांचा इशारा

बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार हे ‘अवैध’ आहे. या सरकारने डिसेंबरपर्यंत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात अन्यथा देशातील परिस्थिती बिघडेल, असा सूचक इशारा बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उज-जमां यांनी दिला आहे.

बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतर त्याचे हिंदुस्थानसोबतचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी दिलेला इशारा हा महत्त्वाचा मानला जात आहे. जनरल वकार यांनी म्यानमारसाठी प्रस्तावित ‘राखीन कॉरिडॉर’ला ‘पूर्णपणे अस्वीकार्य’ म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशची जमीन कोणत्याही कॉरिडॉरसाठी किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी वापरली जाऊ शकत नाही. तसेच, निवडणूक न झालेल्या सरकारला असा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जनरल वकार यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांना सैन्याच्या बाबींमध्ये हस्तक्षेप थांबवण्याचा आणि राखीन कॉरिडॉरसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सेनेला विश्वासात घेण्याचा सूचक इशारा दिला आहे. त्यांनी अंतरिम सरकारला ‘अवैध’ संबोधून असल्यामुळे बांगलादेशी लष्कर आणि सरकार यांच्यातील तणाव वाढला आहे.

मार्च 2025 मध्ये, जनरल वकार यांच्याविरुद्ध तख्तापलटाचा कट रचला गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, ज्यामध्ये काही पाकिस्तान समर्थक अधिकाऱ्यांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताच्या गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने हा कट उधळला गेला. बांगलादेशच्या लष्कराने या अफवांना खोडून काढले आणि जनरल वकार यांनी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली आहे.