पाहुण्या बांगलादेशने यजमान वेस्ट इंडीजला दुसऱया कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी 101 धावांनी धूळ चारत शंभर नंबरी विजय साजरा केला. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. बांगलादेशचा तैजुल इस्लाम या कसोटीचा मानकरी ठरला, ‘मालिकावीरा’चा बहुमान बांगलादेशच्याच तस्कीन अहमदला मिळाला.
बांगलादेशने 164 धावसंख्या उभारल्यानंतर वेस्ट इंडीजला 146 धावांवर गुंडाळून पहिल्या डावात 20 धावांची आघाडी मिळविली होती. मग बांगलादेशने दुसऱया डावात 59.5 षटकांत 268 धावसंख्या उभारून विंडीजला विजयासाठी 287 धावांचे आव्हान दिले होते, मात्र यजमानांना 50 षटकांत 185 धावांवर रोखून बांगलादेशने एक देदीप्यमान विजय मिळवित कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले.
जाकीर अलीचे शतक हुकले
त्याआधी बांगलादेशने तिसऱ्या दिवसाच्या 5 बाद 193 धावसंख्येवरून मंगळवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. जाकीर अलीने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून वन डे स्टाईल फलंदाजी करीत बांगलादेशला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याने 106 चेंडूंत 91 धावांची खेळी करताना 5 षटकारांसह 8 चेंडू सीमापार पाठविले, विंडीजकडून अल्झारी जोसेफ व केमार रोश यांनी 3-3 फलंदाज बाद केले.
तैजुल इस्लामचा विंडीजला ‘पंच’
बांगलादेशकडून मिळालेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मायकल लुईस (6) व त्याच्या जागेवर आलेला किसी कार्टी (14) हे लवकर बाद झाल्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा हुरूप वाढला. विंडीजकडून कर्णधार व्रेग ब्रेथवेट (46) व कॅवेम हॉज (55) यांनीच बांगलादेशच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. इतर फलंदाज अपयशी ठरल्याने विंडीजला पराभवाचा सामना करावा लागला. तैजुल इस्लामने सलामीची जोडीसह मधली फळी कापून काढत 17 षटकांत 5 फलंदाज बाद केले. त्याच्या या बळींच्या पंचमुळे विंडीजला हार पत्करावी लागली. हसन महमूद, तस्कीन अहमद यांनीही 2-2 फलंदाज बाद केले, तर नाहीद राणाला एक विकेट मिळाली.
बांगलादेशचा 15 वर्षांनंतर विंडीजमध्ये कसोटी विजय
बांगलादेशने 2009 मध्ये कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजचा विंडीजमध्ये अखेरचा पराभव केला होता. ग्रेनेडाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने 4 विकेट राखून विजय मिळवला होता. आता 15 वर्षांनंतर वेस्ट इंडीजला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पराभूत करण्यात त्यांना यश आले आहे.