
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
दहा हजार रुपयात बांगलादेशी नागरिक हिंदुस्थानच्या सीमारेषेवरून घुसखोरी करत असल्याचा खळबळजनक खुलासा दिल्लीच्या दहशतवाद विरोधी पथकाने केला आहे. सोमवारी एटीएसने रेल्वेवर मारलेल्या छाप्यात 6 बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. हे सगळेजण बेकायदेशीररित्या हिंदुस्थानमध्ये राहत असल्याचे चौकशीत समोर आले. तसेच त्यांच्याजवळून कुंपणाच्या तारा कापणारे कटर व इतर संशयास्पद वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
हबीबु रहमान, जाकीर हुसैन, मोहम्मद काबिल, कमालउद्दीन, तायजुल इस्लाम आणि लिटोन विश्वास अशी या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. बांगलादेशमधील दलाल कशा प्रकारे 10 हजार रुपयांच्या मोबदल्यात बांगलादेशींना हिंदुस्थानात प्रवेश देतात याबद्दल त्यांनी एटीएसला माहिती दिली आहे. तसेच यात काही पंजाबमधील दलालांचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती घुसखोरांनी एटीएसला दिली. बांगलादेशातील दलाल रस्तेमार्गाने नाही तर नदीमार्गाने सीमारेषा ओलांडून बांगलादेशी नागरिकांना हिंदुस्थानात पाठवत असल्याचेही या सहाजणांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. नदीमार्गाने हिंदुस्थानी सीमारेषेजवळ पोहचवण्यासाठी नावाडी प्रत्येकी तीन हजार रुपये घेतो. त्यानंतर बोटीतील एका गुप्तखोलीत 8 ते 10 जणांना बसवतो. ही खोली कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून त्यावर ताडपत्री झाकली जाते. त्यानंतर रात्री 2 ते 4 च्या सुमारास हिंदुस्थानची सीमारेषा ओलांडून हिंदुस्थानात प्रवेश केला जातो. यावेळी हिंदुस्थानात आधीच घुसखोरी करून आलेले घुसखोर त्यांना नेण्यास येतात. असेही या घुसखोरांनी अधिकाऱ्यांना सांगितले.


























































