
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दोन टक्के पगारवाढ मागे घेऊन सुधारित वेतन करारानुसार वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी बुधवार, ३० मे आणि गुरुवार, ३१ मे रोजी देशव्यापी संपावर जाणार आहे. त्यामुळे त्याचा ताण एटीएमवर पडणार आहे. त्याचा परिणाम म्हणून नोकरदारांचे १ जूनला टाकलेले पगाराचे चेक क्लिअर व्हायला ४ जूनची तारीख उजाडणार आहे.
तीन आठवडय़ांपूर्वी पगारवाढीबाबत बँक कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यात चर्चा झाली होती, मात्र सरकारने २ टक्केच पगारवाढ दिल्यामुळे कर्मचाऱयांनी नाराज होत संपाचे हत्यार उपसले आहे. संपाची आगाऊ सूचना बँक कर्मचाऱयांनी सरकारला दिली होती.
ज्यांचा पगार थेट बँकेत जमा होतो त्यांची पंचाईत होणार नाही, मात्र ज्यांचे पगार चेकद्वारे होतात त्यांचे चेक
१ तारखेला बँकेत भरल्यानंतरही पगाराचे पैसे खात्यात जमा व्हायला
३ जूनची तारीख उजाडेल. त्याचबरोबर सर्वसामान्यांना बँकेतून पैसे काढणे आणि भरण्यासाठी 1 जूनपर्यंत थांबावे लागणार आहे.
हा संप योगायोगाने महिन्याच्या शेवटी आल्यामुळे त्याचा फटका नोकरदारांना मोठय़ा प्रमाणात बसणार आहेच, पण एटीएमचे सुरक्षारक्षकही या संपात सहभागी होणार असल्यामुळे याची तीक्रता वाढेल अशी शक्यता अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजन नागर यांनी वर्तविली आहे.


























































