60 वर्षांची चिरतरुण ‘बार्बी’, 9 मार्चला वाढदिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ढनलाईन । लॉस एंजलिस

तिने साठी गाठली… तरी तिच्या चेहऱ्यावर एक सुरकुती दिसत नाही. ती तरुणच आहे. गोरी असो… किंवा सावळ्या रंगाची, सडपातळ… आकर्षक बांधा असलेली, प्रिन्सेसपासून प्रेसिडंटपर्यंत सर्व लूक्स अगदी व्यवस्थित कॅरी करणारी लहानग्यांची फेवरेट ‘बार्बी ’ डॉल हिचा शनिवारी साठावा वाढदिवस आहे. आजही बच्चे कंपनीत बार्बीची एवढी क्रेझ आहे की दरवर्षी 150 हून अधिक देशांमध्ये 580 दशलक्षाहून अधिक बॉर्बी डॉलची विक्री होत आहे.

बार्बीला मिळालेली प्रसिद्धी ही तीन-चार वर्षांमधली नसून यामागे 60 वर्षांचा प्रवास आहे, असे बार्बीच्या ग्लोबल ब्रॅण्ड मार्केटिंगचे संचालक नाथन बेनार्ड यांनी सांगितले. सध्याच्या जमान्यात कोकाकोला, मॅकडोनाल्ड या ब्रॅण्डना जितकी प्रसिद्धी आहे तितकीचे बार्बीचेही जगभरात नाव असल्याचेही नाथन म्हणाले. लॉस एंजलिसमधील बार्बीच्या मेटल डिझाईन स्टुडिओला दिलेल्या भेटीवेळी नाथन बोलत होते.

असा आहे बार्बीचा प्रवास

  • 9 मार्च 1959 ला न्यूयॉर्कमधील अमेरिकन टॉय फेअरमध्ये बार्बीची बाजारात एण्ट्री झाली. पहिल्याचवर्षी 30 लाख बाहुल्यांची विक्री झाली.
  • रूथ हॅण्डलर यांनी बार्बीचा शोध लावला. त्यांनी स्वतःच्या मुलींसाठी बार्बीची निर्मिती केली. बार्बरा असे त्यांच्या मुलीचे नाव. त्यावरूनच बार्बी हे नाव रूढ झाले.
  • सुरुवातीच्या वर्षी बार्बीची रचना त्यावेळेच्या सौंदर्याची ठेवणे, फॅशन यावर आधारित होती. त्यानंतर कालांतराने बार्बीमध्ये अनेक बदल घडत गेले.
  • साधारण बार्बी डॉलचे डिझाईन तयार व्हायला 12 ते 18 महिन्यांचा काळ लागतो. कॅलिफोर्निया येथील कार्यशाळेत डिझाईन्स तयार झाल्यावर ते चायना आणि इंडोनेशियामधील कारखान्यात बाहुल्या तयार करण्यासाठी पाठवले जाते.