गावप्रमुखांना देशभरातील रिफायनरी दाखवणार, विरोध मोडण्यासाठी प्रशासनाचा नवा फंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिफायनरी प्रकल्पासंबंधित प्रशासनाकडून आज बारसू आणि धोपेश्वर येथील लोकांशी प्रांत कार्यालयात संवाद साधण्यात आला. त्यावेळी प्रशासनाने लोकांचा विरोध मोडून काढण्यासाठी नवा फंडाच अवलंबला. गावाकऱ्यांना या प्रकल्पाचा गाव विकासासह तालुका, जिल्हा, राज्य आणि देशासाठी या प्रकल्पाचा किती आणि काय फायदा होणार आहे याचा प्राधान्याने विचार करावा असे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी यावेळी सूचित केले. त्यासाठी सरपंच, उपरसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठत लोक यांचा देशातील रिफायनरी अभ्यास दौराही भविष्यात आयोजित करणार असल्याचे जिल्हधिकाऱयांनी सांगितले.

प्रशासन त्यासाठी गावांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधण्यास तयार असून त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. यावेळी त्यांनी सध्या माती परीक्षण सुरू असून त्यानंतर प्रकल्पबाबत निर्णय होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. तसेच सध्या सुरू असलेल्या माती परीक्षणासह प्रकल्पबाबत प्रशासनाकडून सविस्तर माहिती दिली जाणार असून त्यासाठी कोणत्या गावामध्ये कधी यावे याची गावाकऱयांनी माहिती द्यावी, त्या ठिकाणी प्रशासन येईल, असे सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सुनील भणसारी, नांदलस्कर, इरफान चौगुले आदी ग्रामस्थांसह एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाले, अप्पर पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर आदी उपस्थित होते.

लाठीचार्ज झाला नाही
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी यांनीही सविस्तर माहिती दिली. तरअप्पर पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगताना पोलिसांनी ग्रामस्थांना कशाप्रकारे सहकार्य केले याची माहिती दिली.