
कोरोना थंडावलाय. नियंत्रणात आलाय. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. परंतु त्यानंतरही सावध राहण्याची आवश्यकता आहे. कारण घातक विषाणू हे ‘डेड झोन’चा आधार घेत आहेत. हे डेड झोन म्हणजे स्वच्छतागृहांमधील वॉश बेसिनच्या वरचा भाग, दरवाजांचे आणि फर्निचरचे कोपरे आहेत. तिथपर्यंत हवेचा वेग पोहोचत नसल्याने विषाणू तिथे आधार घेत आहेत असे पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. त्या विषाणूंना तिथे स्थिरावू न देण्यासाठी घरातील हवा खेळती ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हॉटेल्स, सिनेनाटय़गृहे, मॉल्स, शाळा-कॉलेजे सुरू झाल्याने सार्वजनिक ठिकाणी आता गर्दी दिसू लागली आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमधील हकेच्या प्रवाहाचा आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीयरिंग विभागातील संशोधकांनी अभ्यास केला. खोलीतील वातावरण शुद्ध रहावे यासाठी हवा सतत खेळती राहिली पाहिजे. परंतु ती दरवाजाच्या मागे, कोपऱ्यांमध्ये, फर्निचरभोवती अडून राहते असे प्रा. कृष्णेंदु सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील पथकातील संशोधकांना दिसून
खिडक्या, पंखे, एअर कंडिशनर आणि एक्झॉस्ट पंख्यांमुळे वातानुकूलन चांगले राखता येऊ शकते. परंतु त्यानंतरही हवा वर्तुळाकार फिरून अशा कोपऱ्यांमध्ये घुसते. त्याद्वारे विषाणूंचाही प्रवास कोपऱ्यांच्या दिशेने होतो आणि नंतर तेथील हवेची तीव्रता, वेग कमी झाला की ते तिथे स्थिरावतात. ही परिस्थिती कोरोना प्रादुर्भावाला कारणीभूत ठरू शकते असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
संशोधकांनी स्वच्छतागृहांसारख्या बंद ठिकाणांचे संगणकीय मॉडेल बनवून अभ्यास केला. त्यात त्यांना असे दिसून आले की वॉश बेसिनच्या वरचा भाग हा ‘डेड झोन’ आहे. तिथे विषाणू स्थिरावू शकतात. दर तासाला हवेचा वेग आणि दर्जा वाढवला गेला तरी हवा कोपऱ्यांमध्ये पोहोचत नाही असे प्रा. सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
वॉश बेसिनवरील विषाणू दहा पट घातक
कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीने सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील वॉश बेसिनचा वापर केला तर त्या बेसिनच्या भागातून इतरांना होणारा कोविडचा संसर्ग हा तेथील अन्य भागापेक्षा दहा पटीने जास्त असू शकतो, असे संशोधकांनी सांगितले.
संशोधकांनी सुचवलेले उपाय
स्वच्छतागृहांमध्ये अतिरिक्त पंखे लावावेत.
पंख्यांची दिशा ‘डेड झोन’कडे असावी
वॉशरूम्सचे प्रवेश दरवाजे थोडे उघडे ठेवावेत.

































































