
विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱया व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू लाटांच्या माऱयाने ढासळली. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका सुरूच आहे. पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही पडझड थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हा किल्ला आता युनेस्कोच्या ताब्यात गेल्यामुळे किल्ल्याचा कायापालट होईल, असा विश्वासही स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असल्याने लाटांचा वेग या दरम्यान वाढत असतो. अशातच काल रात्रीच्या वेळेस किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली. किल्ल्याची बांधणी करताना तसेच त्याचा विस्तार करताना सागर तटबंध आणि खडकांची नैसर्गिक रचना याचा विचारपूर्वक वापर करण्यात आला होता.
ट्रायपॉडचा वापर करा!
लाटा सरळ तटबंदीवर आढळून किल्ल्याचे नुकसान होऊ नये म्हणून तिरक्या उताराची खडकांची मांडणी केली होती. कालांतराने ही रचना कमकुवत होत गेली. मात्र नंतर हा मारा थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. काँक्रीटच्या ट्रायपॉड वापर करून लाटांचा मारा कमी करता येईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.