
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील बावनदीला पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारीच बावनदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. वांद्री बाजारपेठ येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला होता. कोळंबे परचुरी मार्गावर असलेल्या पुलावरून सकाळी पाणी वहात होते. मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पुलाच्या खालून पाणी वाहू लागले आहे. मात्र पुरातून वाहत येणारा कचरा या पुलावर साचला आहे.
बावनदी वरून येणाऱ्या अवजड वाहनांना थांबवण्यात आले आहे. आज मोहरम निमित्त सुट्टी असल्याने अनेक कार्यालये बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळही या मार्गावरून कमी प्रमाणात असेल. मार्गावरील वाहतूक बंद असल्याने बाजार खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होणार आहे. तर दुसरीकडे सप्तलींगी, तळे कांटे, वांद्री, उक्षी, मानसकोंड, परचुरी, कोळंबे, गावमळा परिसरात पुराचे पाणी नदीकाठच्या भातशेतीत घुसल्याने शेती कुजण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.