हिंदुस्थानच्या महिला जगज्जेतींचा गौरव, बीसीसीआयकडून 51 कोटींचा पुरस्कार

2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकलेल्या हिंदुस्थानच्या पुरुष संघाला बीसीसीआयने तब्बल 125 कोटी रुपयांचा भव्य पुरस्कार जाहीर केला होता. त्यामुळे आयसीसी वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या महिला संघालाही पुरुष संघाइतकाच रोख पुरस्कार जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र प्रत्यक्षात बीसीसीआयने हिंदुस्थानी महिला संघाला 51 कोटी रुपयांचे रोख इनाम जाहीर केले आहे. ही रक्कम खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि निवड समिती यांच्यात विभागली जाणार आहे. याशिवाय, आयसीसीकडून हिंदुस्थानी विजेत्यांसाठी 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 40 कोटी रुपये मिळणार आहेत. हिंदुस्थानने यापूर्वी 2023 मध्ये अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकला होता, पण वरिष्ठ महिला संघासाठी हा पहिलाच जागतिक किताब होता. 2005 आणि 2017 मध्ये हिंदुस्थान महिला उपविजेत्या ठरल्या होत्या. यावेळी उपांत्य फेरीत हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली, तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. जगज्जेती कामगिरी केल्यानंतर क्रांती गौड आणि रेणुका सिंहला त्यांच्या राज्य सरकारकडून एक-एक कोटींची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने जगज्जेत्या संघातील खेळाडूंना अडीच कोटी रुपयांची बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली असल्यामुळे जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना या दोघींनाही प्रत्येकी अडीच कोटी रुपये मिळतील.