
ICC T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली असून इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा 5 मार्च रोजी सामना होणार आहे. याच दरम्यान BCCI ने टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्यावहिल्या वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
टी20 वर्ल्ड कपचा रणसंग्राम संपल्यानंतर IPL 2026 चे धुमशान सुरू होईल आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये वनडे मालिका खेळली जाणार आहे. 2027 च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका टीम इंडियासाठी सरावाचा महत्त्वपूर्ण भाग असेल. 14 जून ते 20 जून दरम्यान ही तीन सामन्यांची वनडे मालिका हिंदुस्थानात खेळली जाणार आहे.
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये पहिला वनडे सामना 14 जून रोजी धर्मशाळा येथे खेळला जाईल, दुसरा वनडे सामना 17 जून रोजी लखनऊमध्ये आणि तिसरा वनडे सामना 20 जून रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही.

























































