बीसीसीआयचा गिलला बोनस, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी थेट हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मुख्य संघात स्थान न मिळालेल्या शुबमन गिलला राखीव खेळाडू म्हणून संघात घेण्यात आले होते, मात्र साखळी सामने संपताच त्याला थेट घरी पाठविण्यात आल्याने प्रसारमाध्यमांवर क्रिकेटप्रेमींनी बीसीसीआयला चांगलेच सुनावले होते. त्यामुळे त्याची भरपाई करताना बीसीसीआयने या क्रिकेटप्रेमींच्या गळय़ातला ताईत असलेल्या गिलकडे थेट झिम्बाब्वे दौऱयासाठी हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व सोपविले आहे. 6 जुलैपासून सुरू होणाऱया या मालिकेत हिंदुस्थानचा संघ पाच टी-20 सामने खेळणार आहे.

झिम्बाब्वे दौऱयासाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे हिंदुस्थान ब संघ या दौऱयासाठी जाणार आहे. यात गिलसह यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसनसारखे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळू न शकलेल्या युझवेंद्र चहलला झिम्बाब्वे दौऱयासाठी स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करणाऱया सर्व खेळाडूंना या दौऱयावर निवडण्यात आले आहे. मात्र अचानक संघाबाहेर करण्यात आलेल्या इशान किशनला संघाबाहेरच ठेवण्यात आले आहे. मात्र संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलला स्थान देण्यात आले आहे.

 हिंदुस्थानचा संघ ः शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक गायकवाड, रिंकू शर्मा, संजू सॅमसन, ध्रुव ज्युरेल, नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्णोई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.