नवा गुरू, शोध सुरू; बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले

वर्तमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची मुदतवाढ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपत असल्यामुळे बीसीसीआयने टीम इंडियासाठी नव्या गुरूचा शोध अखेर सुरू केला आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी आजपासूनच अर्ज मागवले असून अंतिम तारीख 27 मे असेल.

गेल्याच आठवडय़ात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवणार असल्याचे संकेत दिले होते आणि आज त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकत इच्छुकांकडून अर्ज मागवत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कप संपताच हिंदुस्थानी संघाला नवा गुरू लाभणार आहे. सचिव शाह यांनी द्रविड पुन्हा अर्ज करू शकतात असे म्हटले होते, मात्र गेली चार वर्षे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक सांभाळल्यानंतरही तो संघाला एकही जगज्जेतेपद जिंकून देऊ शकलेला नाही. त्यामुळे आणखी साडेतीन वर्षे तो या पदासाठी पुन्हा अर्ज भरण्याची शक्यताही नसल्याचे अंदाज जाणकार वर्तवत आहेत. त्यामुळे टीम इंडियाला नवा गुरूच लाभणार हे निश्चित आहे. नवा गुरू विदेशी असेल की परदेशी हे 27 मेनंतर कळेलच.

नव्या प्रशिक्षकांचा कार्यकाळ साडेतीन वर्षांचा

येत्या 27 मेपर्यंत मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज येणे अपेक्षित आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी, मुलाखती घेतल्या जातील आणि त्यानंतर नव्या प्रशिक्षकाची निवड केली जाईल आणि 1 जुलैपासून 31 डिसेंबर 2027 पर्यंत त्याच्याकडे संघाचे प्रशिक्षकपद सोपवले जाईल. म्हणजेच नवा प्रशिक्षक चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 आणि 2027, टी-20 वर्ल्ड कप 2026 आणि वन डे वर्ल्ड कप 2027 या स्पर्धांत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवेल. याचाच अर्थ नव्या गुरूसमोर तीन पांढऱया चेंडूंचे वर्ल्ड कप आणि दोन कसोटीच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला जगज्जेतेपद जिंकून देण्याचे आव्हान असेल.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी नव्या अटी-शर्ती

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी नव्या अटी-शर्ती ठेवल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला लाभणार नवा गुरू चांगला कसोटीपटू असेल हे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयच्या नव्या अटीनुसार प्रशिक्षक साठीचा नसावा म्हणजेच वय हे 60 वर्षांच्या आतील असावे. तो कमीत कमी 30 कसोटी आणि 50 वन डे सामने खेळलेलाही असायला हवा. जर एखाद्या प्रशिक्षकाला या अटी-शर्ती पूर्ण करता येत नसतील तर तो किमान दोन वर्षे कसोटी दर्जा असलेल्या संघाचा किमान दोन वर्षे मुख्य प्रशिक्षक असायला हवा. किंवा कोणत्याही सहसदस्य, आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय लीग किंवा प्रथम श्रेणी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद किंवा राष्ट्रीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षकपद किमान तीन वर्षे सांभाळलेले असायला हवे. अशा नव्या अटी टाकल्या आहेत. एवढेच नव्हे तर अर्ज करणाऱया उमेदवाराकडे बीसीसीआयच्या लेव्हल थ्रीचे प्रमाणपत्र असायला हवे.